साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभाग व वाघ नगर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यां मध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नाट्य व नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाट्न HD फायर चे मिहीर घोटीकर, माजी विद्यार्थी आकाश कांकरिया, केशव स्मृती समूहाचे नितीन चौधरी, जनता बँकेचे अध्यक्ष श्री सतीश मदाने यांच्या हस्ते करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान च्या अध्यक्ष्या शोभा पाटील, सचिव रत्नागर गोरे, अविनाश आचार्य विद्यालयाच्या शालेय समिती प्रमुख व विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहकोषाध्यक्ष हेमलता अमळकर, संचालिका वैजयंती पाध्ये, मुख्याध्यापिका योगीता शिंपी, वाघ नगर शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, परिक्षक योगेश शुक्ल सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे, समन्वयिका सीमा पाटील यांची उपस्थिती होती.
पहिल्या पुष्पात शिवजन्मा पूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, संतांचे कार्य, मराठीची महती,शहाजी -जिजाऊ लग्न प्रसंग, शिवजन्म इ प्रसंग तसेच ही मायभूमी,शेतकरी गीत, मी मराठी,गोंधळ, ज्ञाना झालसी पावन, डोहाळे,पाळणा गीत इ गीतावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केली.
शिवरायांचे बालपण व त्यांच्या बालपणी त्यांनी खेळलेले खेळ तसेच जिजाऊंनी त्यांना कशाप्रकारे घडवले त्याचे प्रत्यक्ष दर्शन प्रसंगांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच शिवबा विवाह दृश्य , रायरेश्वराची प्रतिज्ञा या प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले . मर्दानी खेळाचे सादरीकरणही विद्यार्थ्यांनी केले. ओवी, अंगाई गीत, पोवाडा, गोंधळ यावर आधारित नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगीता शिंपी व वाघ नगर विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.