साईमत जळगाव प्रतिनिधी
दि. १४ फेब्रुवारी तसा व्हॅलेंटाइन-डे(प्रेम दिवस) पण उज्ज्वलस्प्राउटर गेल्या २१ वर्षांपासून म्हणजेच २००४ पासून हा दिवस “आजी-आजोबा” दिवस म्हणून विविध पद्धतीने तसेच विविध ठिकाणी साजरा करत असतो, जसे कि मंदिरात, वृद्धाश्रमात आणि शाळेत. यावर्षीचा आजी-आजोबा दिवस हा शाळेत मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला.
आजच्या आजी-आजोबा दिवसाचे उद्घाटन जमलेल्या काही निवडक आजी-आजोबा तसेच प्रशासकीय अधिकारी स्वप्नील बोरसे तसेच समन्वयक सुनयना चोरडिया यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी- आजोबांनकरिता बहारदार नृत्य, गीते तसेच कविता सादर केल्या. आजी-आजोबांच्या मनोरंजना करिता विविध खेळ ठेवण्यात आले होते. सर्व खेळांमध्ये सर्व उपस्थित आजी-आजोबानी उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जवळपास २०० आजी आजोबांनी सदर कार्यक्रमाकरिता आपली उपस्थिती लावली. आजी-आजोबाना आपल्या शाळेच्या दिवसाच्या आठवणी मध्ये नेण्याकरिता त्यांच्याकरिता गुळातील बोरं, आवळे, चिंचा, तसेच लिमलेटच्या गोळ्या त्यांना देण्यात आले, जेणे करून त्यांना त्याच्या बालपणाची एकदा आठवण होईल. तसेच काही आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या विविध उपक्रमांबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानले, काही आजी-आजोबांना आपले अनुभव सांगताना गहिवरून आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या संस्थापक अध्यक्षा अनघा गगडाणी यांच्या लिखित प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचा हातात हात घेऊन घेतली व निश्चय केला की ते सदैव आपल्या आजी-आजोबांवर प्रेम करतील नेहमी त्यांचा आदर करतील त्यांची काळजी घेतील आणि भविष्यात त्यांच्या आजी-आजोबांना वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. नंतर सर्व आजीआजोबानी आपल्या नातवंडानसोबत डब्बा पार्टीचा आनंद घेतला. विविध खेळांमधील विजेत्या आजी-आजोबांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षिका राजश्री तिवारी, साधना खरे यांनी केले तसेच प्रश्नमंजुषाचे संचालन अनघा जोशी यांनी तर विविध खेळांचे नियोजन क्रीडा शिक्षक विजय विसपुते, रामचंद्र मालुसरे यांनी केले. तसेच समन्वयक सुनयना चोरडिया यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता अध्यक्षा अनघा गगडाणी, विश्वस्त प्रवीण गगडाणी तसेच मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले.