साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील लोकनायक स्व.महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान, हिरकणी महिला मंडळ, युगंधरा फाऊंडेशन, चाळीसगाव विकास मंच तसेच भुजल अभियान व पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कराटे प्रशिक्षण वर्गास युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा २५० विद्यार्थिनींनी लाभ घेतला. यावेळी प्रशिक्षिका वर्षा चौधरी यांनी वेगवेगळ्या प्रात्यक्षिकेतून मुलींना स्वरक्षणाविषयक टिप्स दिल्या.
प्रत्येक युवती आणि स्त्री यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून आत्मनिर्भर व्हायला हवे. आज राष्ट्ररक्षण करणारी, स्वतःचे रक्षण करू शकणारी, सुसंस्कारित पिढी घडविणाऱ्या स्त्रियांची आवश्यकता आहे. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे गिरविता यावेत, यासाठी कराटे प्रशिक्षण घेण्यात आले. यशस्वीतेसाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, चाळीसगाव पोलीस दल यांनी परिश्रम घेतले.