राज्यातील रास्त भाव दुकानदारांचा संप मागे

0
22

साईमत मुंबई प्रतिनिधी

राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे व ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने देशातील तसेच राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर १ जानेवारी पासून राज्यातील ५३ हजार स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर होते. याबाबत नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने महासंघाला बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. बैठकीत प्रलंबित मागण्या बाबत समाधानकारक चर्चा होऊन महासंघाकडून राज्यातील रास्त भाव दुकानदारांचा संप मागे घेत असल्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे व ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने देशातील तसेच राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर १ जानेवारी पासून राज्यातील ५३ हजार स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर असून त्या अनुषंगाने आज दिनांक १० जानेवारी, रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने महासंघाला बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित असलेल्या १६ मागण्या बाबत सविस्तर चर्चा होऊन त्यावर तात्काळ कारवाईचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत नवीन धोरण लवकर जाहीर करण्यात येईल, तसेच मार्जिनची रक्कम दुकानदारांना दर महिन्याच्या पाच तारखेला देण्यात येईल, दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव वित्तीय विभागाकडे सादर करण्यात आलेला असून त्यावर निर्णय झाल्यानंतर सर्वांना कळविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

त्यानुसार महासंघाच्या वतीने राज्याचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सहसचिव, तातोबा कोळेकर, कक्ष अधिकारी नितीन सोनखासकर यांना महासंघाकडून राज्यातील रास्त भाव दुकानदारांचा संप मागे घेत असल्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. तसेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबई येथे बोलवण्याबाबत विनंती मंत्री महोदयांना करण्यात आली असून, स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मागे घेण्याबाबत व आपल्या अडचणी मागण्या मार्गी लागण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सहभाग घेऊन संप मागे घेण्याबाबत संघटनेबरोबर चर्चा करण्याची सूचना केली होती.

अनुषंगाने ना. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सविस्तर चर्चा होऊन पुढील आदेशापर्यंत राज्यातील रास्त भाव दुकानदारांचे “रेशन बंद” आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, राज्यातील संप स्थगित केला तरी देशव्यापी संपाबाबतचा निर्णय अजून झालेला नासल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

या शिष्टमंडळात राज्य संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव, जेष्ठ उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, महेंद्र बोरसे, मधुकर चव्हाण, सचिन कारोडे, सोमनाथ वाचकल, कौस्तुभ जोशी, जळगावचे जिल्हा सचिव सुनील अंभोरे, कार्याध्यक्ष सुनील जावळे आदींसह राज्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here