२.४६ कोटींचा निधी मंजूर ; तरीही ठेकेदार बेपत्ता, सा.बां.वि.चे दुर्लक्ष
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा भागातील सोनीनगर ते ओमकार पार्कदरम्यान सुरू असलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. २.४६ कोटींचा निधी मंजूर असूनही ठेकेदाराने काम थांबवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखरेखीत दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रस्ता रखडला आहे. याठिकाणी अपघातांच्या घटना वाढल्या असल्याने रखडलेला रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पिंप्राळा भागातील सोनीनगरजवळील पुलापासून पुढे रस्ता न उरल्याने खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. कामाचा ठेकेदार अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरातील रहिवासी संभ्रमात आहेत. निधीअभावी काम थांबवले असल्याचा ठेकेदाराचा दावा असला तरी निविदेत काम पूर्ण झाल्यानंतरच देयक दिले जाणार, अशी अट स्पष्ट आहे. खड्डे आणि डबक्यांमुळे वाहने बंद पडतात. सोनीनगरजवळील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्याचे सिमेंट काँक्रिट काम अर्धवट राहिल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. पुलावर पाण्याचे डबके साचल्याने आणि खड्डे निर्माण झाल्याने रिक्षा, स्कूल बस, दुचाकी यांची वाहतूक अडथळ्यात येते.
रस्ता सुरळीत करून काम त्वरित पूर्ण करा
विजयनगर, सावखेडा, श्रीरामनगर, बाबुराव नगर, गणपती नगर व ओमकार पार्क या भागातील नागरिकांना दररोज या रस्त्यानेच प्रवास करावा लागतो. त्यामुळे रस्ता सुरळीत करून सिमेंट काँक्रिटचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी स्थानिक महिलांसह नागरिकांनी केली आहे.



