सासऱ्याच्या घरात डल्ला मारणारा जावई पोलिसांच्या ताब्यात

0
7

२८ लाख ५५ हजारांचा ऐवज हस्तगत

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी 

शहरातील सोमनाथ नगरात राहणारा एका ६४ वर्षीय वृध्दाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरटा हा वृद्धाचा जावईच निघाल्याने खळबळ उडाली आहे. राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी ता. भुसावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. दरम्यान, कर्जबाजारातून त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.

सविस्तर असे की, भुसावळ शहरातील सोमनाथ नगरमध्ये अनिल हरी बऱ्हाटे (वय ६४) हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. सोमवारी, २ डिसेंबर रोजी त्यांच्या पुतण्याचे लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम असल्यामुळे बऱ्हाटे दाम्पत्य दुपारी २ वाजता घर बंद करून हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. यावेळी संशयित आरोपी राजेंद्र झांबरे हा हळदीच्या कार्यक्रमात होता. त्याने बाहेर जाऊन येतो, असे सांगून तो थेट सासरे अनिल बऱ्हाटे यांच्या घरी गेला. त्याने घराच्या मागची खिडकीची लोखंडी गज कापून घरात प्रवेश करत घरातून ३३ तोळे सोन्याचे दागिने आणि २ लाख ६० हजार रुपयांची रोकड असा २८ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी खोलवर चौकशीला सुरुवात केली. यामध्ये संशयित आरोपी राजेंद्र झांबरे हा कर्जबाजारी झालेला होता, अशी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजेंद्र झांबरे याला ताब्यात घेतले. त्याला खाकी दाखवताच सासऱ्याच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले संपूर्ण मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर उमाकांत पाटील, पोलीस नाईक सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भूषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here