
‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे १५ नोव्हेंबरपर्यंत कथेचे आयोजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारतीय सनातन संस्कृतीत पवित्रतेचे आणि मातृत्वाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौमातेची सेवा सर्वश्रेष्ठ मानली जाते. धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही गोवंशाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘श्री गौ कृपा कथा’ भव्य धार्मिक कथा ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केली आहे. ही कथा श्री पांजरापोळ ‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे, नेरी नाक्याजवळील पांजरापोळ प्रांगणात दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित केली आहे.
कथेत कथा वाचक, संगणक अभियंता आणि गौसेवेचा प्रचार करणाऱ्या पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी गौमातेच्या सेवेमागील धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलूंवर प्रकाश टाकतील. दीदींनी केवळ वयाच्या विसाव्या वर्षी संन्यास स्वीकारून अध्यात्माच्या मार्गावर पदार्पण केले आहे. त्या देशभर गौसेवा, गोपालन आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करीत आहेत. कथेच्या शेवटच्या दिवशी पूज्य स्वामी गोपालाचार्य स्वामी गोपालानंद सरस्वती उपस्थित राहून गौआधारित आरोग्यविषयक माहिती देतील. ज्ञानवर्धक आणि अध्यात्मिक सोहळ्यात अधिकाधिक भाविकांनी परिवारासह उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आयोजक पांजरापोळ ‘गौतिर्थ’ संस्थेतर्फे केले आहे.


