साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथे वीज महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत आ.चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिकांसह मतदार संघातील शेतकऱ्यांना घेऊन मुक्ताईनगर येथील वीज महावितरणचे विभागीय कार्यालय येथे गुरुवारी, ६ जून रोजी दुपारी १२ वाजता जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर निवेदन देण्यात आले. तसेच वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा थेट इशाराही दिला आहे. यावेळी मुक्ताईनगर वीज महावितरण विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता विवेक स्वामी, मुक्ताईनगर उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर ढोले यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी सद्यस्थितीत अस्मानी संकटांनी त्रस्त झालेला आहे. त्यातच प्रचंड उन्हाचा तडाखा बसत असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील जनताही हवालदील झालेली आहे. अशा परिस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील वीज महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे विजेचे तार खंडित होणे, केबल जळणे, ट्रान्सफॉर्मर जळणे अशा किरकोळ घटना घडल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने १२ ते १६ तास वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अडचणीचे होते. तसेच मुक्ताईनगर शहरासह गाव खेड्यातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. नागरिकांना वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे. सर्व बाबींना महावितरणचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. याप्रकरणी तात्काळ योग्य त्या उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निमखेडी बुद्रुक उपकेंद्राला स्वतंत्र ३३ केव्ही लाईन जोडणी करून मिळावी, याबाबतही निवेदन देण्यात आले. निमखेडी बुद्रुक येथील उपकेंद्राला निमखेडी खुर्द, घोडसगाव असे उपकेंद्रमधून लाईट जात आहे. ते मलकापूर तालुक्यातून वाघोदा पूर्णा नदी ओलांडून गेलेली असल्याने वेळोवेळी वातावरणातील बदलाने लाईट ट्रिप होऊन तांत्रिक बिघाड होत असल्याने शेतकऱ्यांना व परिसरातील गावकऱ्यांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास होत आहे. तसेच गावाच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. कुऱ्हा किंवा दूई उपकेंद्रातून निमखेडी बुद्रुक उपकेंद्राला स्वतंत्र ३३ केव्ही लाईन जोडणी करून मिळावी, असे निवेदनही शिवसेनेच्यावतीने देण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी आ.चंद्रकांत पाटील, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, शहर प्रमुख गणेश टोंगे, भागवत कोळी, शिवराज पाटील, प्रफुल्ल पाटील, वसंता भलभले, गणेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते.