साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथे सोमवारी, २ ऑक्टोबरपासून चोरट्यांची दहशत थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. चक्क दुसऱ्या दिवशी चाळीसगाव रस्त्यावरील भोरटेक येथील पोलीस पाटील व एका मजुरास चाकू लावून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लांबविल्याची घटना रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. परिसरात एका पाठोपाठ एक घटना घडत गुन्हेगार प्रवृत्तीने डोके वर काढत दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे.
सविस्तर असे की, चाळीसगाव रस्त्यावरील भोरटेक येथील पोलीस पाटील राजेंद्र महाजन हे त्यांच्या शेताकडे जात होते. तेव्हा मागून तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून पैसे व मोबाईल हिसकावत पसार झाले. तेथून दोनशे मीटरच्या अंतरावर विनोद पावरा नामक मजुराला अडवून त्यालाही मारहाण करत त्याच्या खिशातील रोख रक्कम मोबाईल हिसकावूून पसार झाले. गेल्या दोन ते तीन दिवसात दोन ठिकाणी दरोडा आणि दोन ते तीन ठिकाणी रस्ता लुटण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती गावातच समजताच कजगाव पोलीस मदत केंद्रावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिसांकडून अद्यापही लुटारु अथवा दरोडेखोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी आळा घालावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.