साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
चाळीसबिघा परिसरातील डॉ.मनोज पाटील ते कोलते हॉस्पीटलपर्यंत नाली व रस्त्याचे काम मंजूर तसेच वर्कऑर्डर होऊनही संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट करीत गेल्या काही महिन्यांपासून ते बंद आहे. तेव्हा नाली व रस्त्याचे काम येत्या सात दिवसात सुरू करण्यात यावे, अन्यथा अधिकाऱ्यांना चपलांचा हार घालू व तोंडाला काळे फासू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी २३ एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील चाळीसबिघा परिसरात डॉ.मनोज पाटील ते कोलते हॉस्पीटलपर्यंत डांबरीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश १७ मे २०२३ रोजी संबंधित कंत्राटदारास न.प. प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने कामामधील नालीचे काम सुरू केले. तेही अर्धवट करून काम गुंडाळण्यात आले. त्याचबरोबर कामाच्या कार्यारंभ आदेशावेळी डांबरीकरणाच्या रस्त्याचाही कंत्राट संबंधित कंत्राटदारास देण्यात आलेला होता. परंतु या कार्यारंभ आदेशाप्रमाणे ना नालीचे काम पूर्ण करण्यात आले तर रस्त्याचे काम करण्यातच आले नाही.
निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर उपप्रमुख बळीराम बावस्कार, शिक्षक आघाडीचे संजय पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.