जळगाव एलसीबीची कारवाई, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) धडाकेबाज कारवाईत प्रवाशांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कारवाईत एका रिक्षा चालकास अटक केली आहे. दरम्यान, त्याच्याकडून रिक्षासह १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी सद्दाम हुसेन बागवान (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सहा वाजता जळगावहून भुसावळकडे रिक्षाने जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील २५ हजारांची रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने संशयित आरोपी शोएब हमीद खान (वय २५, रा. शाहुनगर, भिस्ती मोहल्ला, जळगाव) यास ताब्यात घेतले. चौकशीत शोएबने आपल्या साथीदार प्रधुम्न उर्फ बंटी नंदु महाले (रा. खंडेराव नगर, जळगाव) आणि टोनी (रा. पिंप्राळा) यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.
दोन्ही साथीदार फरार, शोध सुरु
आरोपी शोएबकडून त्याच्या वाट्याला आलेली ३ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली प्रवासी रिक्षा असा मिळून १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, त्याचे दोन्ही साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. टोळीने जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
कारवाईत यांचा होता सहभाग
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. शरद बागल, स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अक्रम शेख, विजय पाटील, उमाकांत पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पो.ना. किशोर पाटील, पो.कॉ. प्रशांत परदेशी, रवींद्र कापडणे यांनी केली. तांत्रिक मदत पो.कॉ. पंकज खडसे, गौरव पाटील, मिलिंद जाधव यांनी केली.