पत्रकार परिषदेत जनसेवेचा लढा सुरू ठेवण्याची दिली ग्वाही
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी
पाचोरा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी सोमवारी, २५ रोजी चार वाजता शिवालय कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष आणि मतदारांनी केलेल्या सहकार्याचे आभार मानले. पराभवाने खचून न जाता मी यापुढेही सदैव जनते सोबत राहणार आहे. राज्यात लागलेला निकाल लोकशाहीचा ‘संकोच’ करणारा आहे. त्यामुळे राज्यात लागलेला निकाल संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे इस्माईल फकिरा, ॲड.अविनाश भालेराव, सचिन सोमवंशी, शिवसेनेचे दीपक राजपूत, उद्धव मराठे, अरुण पाटील, शरद पाटील, भडगावचे दीपक पाटील, डी.डी.पाटील, महिला आघाडीच्या योजना पाटील, ॲड. आण्णासाहेब भोईटे, सुनील शिंदे उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, अडीच वर्षांत मी केलेल्या कामांची दखल घेवून मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला ६९ हजार मते दिली, हे काही कमी नाही. निवडणुकीत मी रणरागिणीसारखी एकटी लढली, हा लढा पुढेही सुरूच राहील. निवडणुकीत मी सेटलमेंट केली नाही किंवा मॅनेज झाली नाही. आलेल्या निकालाचे विश्लेषण केल्यावर निकाल भयानक आणि जनमताचा विश्वासघात करणारा आहे. हा विजय ईव्हीएमचा आहे. त्यामुळे निकालाने देश हादरला आहे. लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल पाहिल्यास आलेला निकाल लोकशाहीचा खून करणारा आहे. ईव्हीएमचा हा अतिरेक आहे. निवडणुकीत पैशांची प्रचंड उधळण झाली. एकतर्फी इतकी मते पडूच शकत नाही. पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, असे जनमत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जनतेसोबत असल्याचे दिले वचन
देशात महिला सुरक्षित नाही, बेरोजगारी, महागाईने जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही. मतदार संघांत सुरू असलेले दोन नंबरचे धंदे बंद झाले पाहिजे. जनतेने दिलेला कौल मान्य आहे. माझं काम थांबणार नाही, जनसेवेचा लढा सुरूच राहील. मतदारसंघातील प्रशासनाने कोणाच्याही दबावात काम करू नये. जनतेला न्याय देण्याची भूमिका ठेवावी. नियमांची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घ्यावी. जिथे कुठे चुकीचे आणि अन्याय होत असेल तर मी जनतेसोबत असल्याचे वचन त्यांनी दिले. राजकारणात जय, पराजय हा होत असल्याचे त्यांनी सांगून आ. किशोर पाटील विजयी झाल्याबद्दल त्यांनी शुभकामना व्यक्त केल्या.