‘तुमको ना भुल पायेंगे’ म्हणत जळगावकरांनी वाहिली आदरांजली
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांच्या जाण्याने एक अभ्यासू, परखड, स्पष्टवक्ता असलेला मनपातला आवाज हरपला आहे. त्यांच्या जाण्याने जळगाव शहर विकासाविषयी प्रचंड आस्था असलेला संवेदनशील मनाचा आवाज आपल्यातून निघून गेल्याची भावना ‘तुमको ना भुल पायेंगे’ या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या. मुळचा नाट्य कलावंत त्यानंतर राजकारणात आलेला अनंत जोशी हा मनाचा प्रचंड हळवा आणि तत्त्वांवर चालणारा मित्र होता, अशा भावना श्रद्धांजली सभेच्या सुरवातीला परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी व्यक्त करतांना त्यांच्या आठवणी सांगितल्या.
जळगाव शहराच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करताना बंटी जोशी यांच्या आठवणींना आ. राजूमामा भोळे यांनी उजाळा दिला. युवा मोर्चात काम करत असतानाचे अनुभव, महानगरपालिकेतील सहकारी असतांना मांडलेले मुद्दे, भूमिका व त्यांचे कार्य हे अतिशय प्रभावी होते. आपण सर्व मिळून त्यांच्या आठवणी जाग्या ठेवू या…, त्याला अपेक्षित असलेले विकास कार्य करू या… हीच बंटी जोशी यांना श्रद्धांजली ठरू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगतात मी एक जवळचा मित्र, सहकारी गमावला आहे. त्याने अनेक गोष्टी मला सांगितल्या. माझ्याकडे तो मन मोकळे करायचा, त्याच्या जाण्याने कुटुंबासोबतच शहराचेही नुकसान झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अनिष शहा यांनी सर्वांशी आदराने व नम्रतेने वागणारा, नगरसेवक म्हणून उत्साहाने काम करणारा नगरसेवक आपण गमावला असल्याचे मत व्यक्त केले.
आज आम्हा मित्रांचा आधार गेला. कुठल्याही कामात पुढे राहणारा मित्र गेल्याची भावना माजी महापौर ललित कोल्हे यांनी व्यक्त केली. ॲड.शुचिता हाडा यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. पत्रकार दिलीप तिवारी यांनी समांतर रस्ता कार्यातील सहभागाच्या आठवणी सांगितल्या. असे आत्ममग्न कोणी असल्यास त्याला बाहेर काढू या… हीच बंटी जोशी यांना श्रद्धांजली ठरेल. गनी मेमन यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपल्या एकाही मित्राला बंटीच्या मार्गाने जाऊ देऊ नका. संवाद साधू या, मी या कार्यासाठी काम करेल, ही भावना व्यक्त केली. किशोर पाटील यांनीही आठवणींना उजाळा दिला.
अनेकांच्या भावना झाल्या ‘अनावर’
कुटुंबातील सदस्य आणि अनंत जोशी यांचे लहान बंधू अभिजीत जोशी यांनी आज मी माझा आधार गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या. सभेतील वातावरण अतिशय शोकाकूल झाले होते. तसेच अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या. अश्रू दाटून आले होते. श्रद्धांजली सभेची सुरवात अंजली धुमाळ यांच्या ‘भेटी लागी जीवा’ या अभंगाने झाली तर समारोप सुदिप्ता सरकार यांच्या ‘मोको कहा ढुंडे रे बंदे’ गीताने झाला. अमित जगताप यांनी शांती मंत्र सादर केला. श्रद्धांजली सभेला नितीन बरडे, अमर कुकरेजा, विनोद पाटील, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, चंदन कोल्हे, विराज कावडिया, जयदीप पाटील, सोनू जाजू, संदीप घोलप, संदीप भावसार यांच्यासह बंटी जोशी यांचा मित्र परिवार, नातेवाईक, प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.