निःस्वार्थ अध्यापनाचा गौरव; भगीरथ इंग्लिश स्कूलच्या किरण व किशोर पाटील यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सन्मान
साईमत /जळगाव /प्रतिनिधी :
शिक्षण क्षेत्रात केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर सेवाभावातून ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब मानली जाते. जळगाव येथील कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमधील आदर्श व उपक्रमशील इंग्रजी विषयाचे शिक्षक किरण विठ्ठल पाटील आणि किशोर प्रताप पाटील यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या इंग्रजी प्रि-एलिमेंटरी, इंग्रजी एलिमेंटरी, इंग्रजी ज्युनिअर व इंग्रजी सीनियर या विविध स्पर्धांसाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन गेल्या पंधरा वर्षांपासून हे दोन्ही शिक्षक सातत्याने मोफत व निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत. शाळेच्या नियमित वेळेव्यतिरिक्त सकाळी ११ ते १२ या वेळेत ते अतिरिक्त अभ्यास वर्ग घेत असून, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयातील कौशल्यविकासासाठी ते अखंड प्रयत्नशील आहेत.
या अथक परिश्रमांचे सकारात्मक फलित म्हणून भगीरथ इंग्लिश स्कूलचा शैक्षणिक निकाल गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने शंभर टक्के लागला आहे. या कालावधीत तब्बल दोन हजार ३४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे भगीरथ इंग्लिश स्कूलची ओळख जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून निर्माण झाली आहे.
या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने किरण पाटील व किशोर पाटील यांना अभिनंदनपत्र, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन्मान समारंभाप्रसंगी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, कार्यवाह अजित खाडीलकर, विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सरिता साठे, विद्यापीठाच्या समन्वयक सारिका तांबे तसेच योगेश लाठी यांनी या दोन्ही शिक्षकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. भविष्यातही असेच उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी योगदान देत राहावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या.
