प्रकाशनाला अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
एमआयडीसीतील स्थित आदित्य लॉनमध्ये येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जळगाव जिल्हा महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे दहावा ऋणानुबंध वधु-वर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी अर्जासह ऑनलाईन प्रणाली, कार्यक्रमाच्या पत्रिकेचे महिला शक्तीच्या हस्ते प्रकाशन उत्साहात पार पडले. प्रकाशन सोहळा संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने सुरू झाला.
याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून अहिर सुवर्णकार महिला मंडळ, जळगावच्या सर्व पदाधिकारी महिला भगिनी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते परिचय अर्ज व निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वधु-वरांसाठी ऑनलाईन माहिती प्रणालीची लिंकही सर्व उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण करून सुरू करण्यात आली. सोहळ्यात परिसरातील महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य तसेच मेळावा समितीच्या सहयोगी महिला उपस्थित होत्या.
आगामी वर्षात होणारा मेळावा आगळावेगळा ठरणार असल्याविषयी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी समाजबांधवांना माहिती दिली. तसेच मेळावा अर्ज, ऑनलाईन लिंक व कार्यक्रम पत्रिका जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन उपस्थित सर्वांना केले. तसेच अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना वानखेडे यांनीही उपस्थित महिलांना मेळाव्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले.
मेळाव्याच्या नियोजनासाठी समाज बांधव घेताहेत परिश्रम
मेळाव्यासाठी मेळावा समिती सदस्य, सहयोगी सदस्य परिश्रम घेत आहेत. मेळावा अत्यंत नियोजनबध्द होईल, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर महिला शक्तीच्या हस्ते मेळावा अर्जाचे प्रकाशन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रकाशन सोहळ्यात समाजातील समाज बांधव, अनेक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, महिला पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय वानखेडे तर सचिव संजय पगार यांनी आभार मानले.