पत्रकार दिनानिमित्त चाळीसगावात पत्रकारांचे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर
साईमत /चाळीसगाव/प्रतिनिधी
पत्रकाराच्या हातात लेखणी हे ब्रह्मास्त्र आहे. मात्र, ते पेलण्याची ताकद आणि जबाबदारी पत्रकाराने स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. पत्रकारितेची ओळख ही केवळ लिखाणावर अवलंबून असते. कपडे, राहणीमान किंवा बाह्य दिखाव्यावर नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त पत्रकार म्हणून काम करून चालणार नाही, तर जिद्द, चिकाटी आणि मूल्यनिष्ठा असणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला प्रमुख वक्ते व ज्येष्ठ पत्रकार सुरेश उजैनवाल यांनी दिला.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पत्रकार दिनाच्या औचित्याने चाळीसगावच्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने शहरातील अरिहंत मंगल कार्यालयात मंगळवार, दि.६ जानेवारी रोजी पत्रकारांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.
या उपक्रमांतर्गत २२ ते २५ पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची विविध आजारांबाबत आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. व्यस्त दिनचर्या व तणावपूर्ण जीवनशैलीमुळे पत्रकारांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हे लक्षात घेऊन पत्रकारांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुरेश उजैनवाल यांनी प्रमुख वक्ते म्हणून पत्रकारांना मार्गदर्शन केले.
यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत समाजात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. कार्यक्रमास शहरातील व परिसरातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मीडियातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
