हजारोंच्या उपस्थितीत रात्री मयतांचे देह झाले ‘अनंतात विलीन’
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील भाविकांनी भरलेल्या बसचे चाक खड्ड्यात पडताच बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. त्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याने भुसावळसह वरणगाव परिसरात शोकमग्न वातावरण निर्माण झाले आहे. विमानाने जळगाव येथे आणलेल्या सर्व मयतांवर रात्री १२ वाजेदरम्यान हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आल्याने मयतांचे देह ‘अनंतात विलीन’ झाले आहेत.
अपघातग्रस्त बसच्या मागून प्रवास करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक इब्राहिम याने नेपाळ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा अपघात डोळ्यासमोर घडल्याचे सांगितले. अपघातग्रस्त बसचे चालक मुर्तजा यांनी ब्रेक लावत खड्ड्यात पडलेल्या बसवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ती पलटी होऊन नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच गोरखपूर आणि महाराज गंजचे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी सतर्क झाले. अधिकारीही लखनौमधून क्षणोक्षणी अपडेट्स घेत राहिले. मुस्तफा उर्फ मुर्तजा ( वय ५५, रा. भगवानपूर, तुर्रा बाजार, पिपराइच) हा गेल्या २५ वर्षांपासून केसरवाणी ट्रान्सपोर्टमध्ये चालक होता. नेपाळसाठी बुकिंग मिळाल्यानंतरच त्याला पाठविण्यात आले. मुस्तफा यांचा मोठा मुलगा इब्राहिमही वडिलांसोबत ट्रॅव्हलर कारमधून नेपाळला जात होता. यावेळीही तो दुसऱ्या वाहनाने वडिलांसोबत नेपाळला गेला. अपघाताच्या वेळी त्यांची गाडी मागे होती. इब्राहिमने ट्रॅव्हल एजन्सीचे व्यवस्थापक धर्मेंद्र यादव यांना फोन करून घटनेची माहिती दिली. दोन बस आणि एक लहान प्रवासी वाहन महाराष्ट्रातील पर्यटकांना नेपाळला घेऊन गेले होते. एक बस मुस्तफाने तर दुसरी बस महाराज गंज येथील पुरंदरपूर येथील आरिफने नेली. अपघातानंतर केसरवाणी वाहतूक व्यवस्थापक धर्मेंद्र यादव यांनी फोनवर बोलून सांगितले की, तिन्ही वाहने ५० मीटर पुढे जात आहेत. मुस्तफा चालवत असलेल्या बसमध्ये प्रवास करणारे तीन पर्यटक पायाला दुखापत झाल्याने प्रयागराजहून घरी परतले होते, असे सांगितले जात आहे.
विमानाने मृतदेह आणले महाराष्ट्रात
नेपाळ प्रशासनाने शनिवारी दुपारी शवविच्छेदन प्रक्रियेनंतर सर्व २७ मृतदेहाचे विमानाने पार्थिव महाराष्ट्रात पाठवले. जखमींना उपचारानंतर भारतात परत आणले जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी सांगितले. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी केंद्रीय स्तरावरून आपल्या पद्धतीने मदतीच्या हालचाली गतीमान करून भुसावळचे आ.संजय सावकारे व काही निवडक पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत नेपाळ गाठून जख्मींची भेट घेत त्यांना दिलासा दिला. यावेळी आ. संजय सावकारे यांनीही पराकाष्ठा करीत राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवली. त्यामुळेच घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नेपाळमधुन २५ मयतांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यात यश आले.
सीमेवर सुरक्षा यंत्रणा सतर्क
नेपाळच्या अपघाताची माहिती मिळताच सोनौली सीमेवर तैनात एसएसबी आणि पोलीस व्यतिरिक्त इतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले. एसडीएम नौतनवा नंद प्रकाश मौर्य यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय कर्मचारी सायंकाळी उशिरा अबू खैरेनी अपघातस्थळी पोहोचले होते. सात जखमींना सोनौली सीमेवरून भारतात आणून नौतनवा परिसरातील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.
नेपाळमधील अनेक रस्ते धोकेदायक
नेपाळच्या प्रमुख पर्यटन शहर काठमांडू आणि पोखराकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नारायणघाट-मुगलीन रस्ता विभाग, मुगलिंग-नौबिसे रस्ता विभाग, मुगलिंग-पोखरा रस्ता, बुटवल-पाल्पा रस्ता, पाल्पा-श्यांजा रस्त्यावरील पूल व रस्त्यांच्या बांधकामामुळे वाहतूक धोक्याची आहे. या मार्गांवर आणखी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी वाहतूक ठप्प होते.
असे प्रवासी होते अपघातग्रस्त
अपघातग्रस्त बसमध्ये गणेश पांडुरंग भारंबे, संदीप राजाराम सरोदे, सुधाकर बळीराम जावळे, सागर कडु जावळे, अविनाश भागवत पाटील, हेमराज राजाराम सरोदे, प्रवीण पांडुरंग पाटील, अनुप हेमराज सरोदे, सुहास प्रभाकर राणे, अनंत ओंकार इंगळे, सुनील जगन्नाथ इंगळे, ज्ञानेश्वर नामदेव बोके, पंकज भागवत भंगाळे, प्रकाश नथ्थू कोळी, सीमा अनंत राणे, सरला सुहास राणे, चंदना सुहास राणे, आशा पांडुरंग पाटील, निलिमा सुनील धांडे, कुमुदिनी रवींद्र भाबंरे, शारदा सुरेश पाटील, निलिमा चंद्रकांत पाटील, एस. भारंबे, सरला तुळशीराम तायडे, गोकर्णी संदीप सरोदे, आशा समाधान बाविस्कर, भारती रवींद्र पाटील, रोहिणी सुधाकर जावळे, निलिमा सुनील भिरूड, विजया कडू जावळे, वर्षा पंकज भंगाळे, सरोज मनोज भिरूड, रुपाली हेमराज सरोदे, पल्लवी सरोदे, आशा ज्ञानेश्वर बोडे, मंगला विलास राणे, रेखा प्रकाश कोळी, अनिता अविनाश पाटील आदींचा समावेश होता.
तीन जख्मी मयत झाल्याची अफवा
अपघातात मयत झालेल्या सर्वांचे मृतदेह शनिवारी रात्री जळगाव येथे आणून त्यांच्या – त्यांच्या गावात रवाना करण्यात आले. सर्वांवर रात्रीच आपआपल्या गावात अंत्यसंस्कार करून त्यांचे देह अनंतात विलीन करण्यात आले. तर काठमांडु येथे उपचारासाठी दाखल असलेल्या १६ पैकी रेखा प्रकाश सुरवाडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमींच्या मदतीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, अतुल झांबरे, केदार ओक, परिक्षित बऱ्हाटे हे रुग्णालयात तळ ठोकून आहेत. मात्र, भुसावळ, वरणगाव, तळवेल, दर्यापुरसह अपघातातील आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. जख्मींची प्रकृती स्थिर असल्याचे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून या वृत्ताचे खंडणकरीत सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारीत केला जात असल्याने अनेकांना दिलासा मिळत आहे. जखमींना पुढील उपचारार्थ महाराष्ट्रात आणले जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.