कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शौचालयात दारूच्या बाटल्यांचे तुकडे पडलेले आहे. तसेच यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात रोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कार्यालयातील शौचालयात घाणीचे साम्राज्यासह दारुच्या बाटल्यांचे तुकडे याठिकाणी पाहावयास मिळत आहे.
याठिकाणी पाण्याची देखील व्यवस्था नाही. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येथील शौचालयात अधिकच घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे दुर्गंधीही पसरली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा या शहरातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शासकीय कार्यालयातील शौचालयात कोणाचे लक्ष नसते का? असा प्रश्न कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा गजर होत असताना, अशा शासकीय कार्यालयातील स्वच्छतेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शौचालयात दारूच्या बाटल्या सापडणे, हे सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर बाब मानली जात आहे. नागरिक आणि कर्मचारी वर्गाने प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.