दुचाकी चालविणे आणि पायदळ चालणे अशक्य, राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष
साईमत/ यावल /प्रतिनिधी :
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने बांधकाम केलेल्या व्यापारी संकुलनासमोर पार्किंग असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायदळ चालणे आणि मोटरसायकल चालवणे अशक्य झाले आहे याकडे संबंधितांचे ‘अक्षम्य’ असे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिनिंग प्रेस व्यापारी संकुलनात लाखो रुपये खर्च करून कराराने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली आहे. दुकानासमोर भव्य अशी पार्किंगची व्यवस्था जागा, रस्ता आहे. परंतु या रस्त्यावर दगड-गोटे युक्त खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुचाकी चालवणे आणि दुचाकी उभी करणे, चार चाकी वाहन दुकानासमोर नेणे, पार्किंग करणे अशक्य झाले आहे. तसेच पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे.
यावल जिनिंग प्रेस व्यापारी संकुल समोर पार्किंग असलेल्या जागेसमोर बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाला लागून सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणि पंचायत समिती कार्यालयाच्या समोर असलेल्या अधिकृत दुकानांच्या समोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहनांसह मालवाहतूक वाहनांची वर्दळ आहे. यावल बसस्थानकापासून बुरुज चौकापर्यंत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांसह पायदळ चालणाऱ्या नागरिकांना आपल्या वाहनांसह जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. एखाद्या वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यास किंवा सुसाट वेगाने जाणारे वाहन वाहनधारकाच्या नियंत्रणात न राहिल्यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावल शहरासह तालुक्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपल्या परिचित, संबंधित, जवळचे, राजकीय सामाजिक नातेसंबंधाचे आपुलकीचे असताना आणि यांचे नेहमी या रस्त्यावरून जाणे-येणे असताना सुद्धा जनतेच्या, व्यापारी वर्गांच्या प्राथमिक दैनंदिन, अडीअडचणींकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आणि अतिक्रमण काढण्याची कार्यवाही स्थगित केल्याने दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने यालाच “अच्छे दिन” म्हणावेत का? अशी चर्चा यावल शहरासह तालुक्यात सुरू आहे.
