सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीला सुरुवात
तालुका वार्तापत्र/मुराद पटेल/चाळीसगाव
आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वातावरणाला आतापासून सुरुवात होऊन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र सद्यस्थितीला चाळीसगाव तालुक्यात दिसत आहे. अशातच त्यामुळे सोशल मीडियावर भाजपा, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व इतर पक्ष कार्यकर्ते यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
आगामी विधानसभा भाजपाकडून आ.मंगेशदादा चव्हाण हेच उमेदवार असतील. मात्र, त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट मिळविण्यासाठी माजी खासदार उन्मेषदादा पाटील प्रयत्नशील आहेत. ते नुकतेच उद्धव ठाकरे यांना मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन भेटूनही आले. त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले करण पवार (पाटील), डॉ.हर्षल माने, पाचोऱ्याचे वैशालीताई पाटील, शिवसेना चाळीसगाव तालुका प्रमुख रमेश चव्हाण, प्रवक्ते दिलीप घोरपडे यांच्यासह इतर पदाधिकारी सोबत होते.
रा.काँ.कडून सतिष दराडे, कैलास सूर्यवंशी
उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून एकदा आमदार राहिलेले व एकदा थोड्या मतदानामुळे पराभूत झालेले राजीवदादा देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दावेदार मानले जात आहे. नुकतेच जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांची शिवरथ यात्रा चाळीसगाव आली होती. तेव्हा राजीवदादा देशमुख हे ही उमेदवारी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीकडून सतिष दराडे, कैलास सूर्यवंशी हेही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.चाळीसगाव तालुक्यात भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून कोण आव्हान देणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
विद्यमान आ.मंगेश चव्हाणच ‘आमदार’ होण्याची जोरात चर्चा
एकीकडे आमदार मंगेश चव्हाण हे विकास कामे व गोरगरीब जनतेच्या कामामुळे पुन्हा आमदार होतील, अशीही चर्चा आहे. समोरून त्यांना आव्हान देणारे उन्मेष पाटील हे एकदा आमदार तर दुसरे वेळेस भाजपाकडून खासदार ही राहिले आहे. त्यांचे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने उमेदवारी कापल्यामुळे नाराज असलेले उन्मेष पाटील यांनी शिवसेना उबाठामध्ये प्रवेश करून करण पाटील यांना लोकसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी पराभव करून स्मिता वाघ ह्या खासदार झाल्या.
मतदारच ठरविणार भावी ‘आमदार’
वाघळीचे माजी सरपंच विकास चौधरी सरपंच असतांना गावात केलेली विकास कामे प्रचंड मोठा जनसंपर्क व तालुक्यातील तरुणांना बेरोजगारीपासून मुक्त करण्यासाठी एक व्हिजन घेऊन विधानसभेच्या आखाड्यात उमेदवारी घेण्यासाठी सज्ज झाल्याचेही सद्यस्थितीला चित्र आहे. दुसरीकडे राजीव देशमुख यांचे चाळीसगाव शहर व व्यापारी वर्गात व ग्रामीण भागात यांच्या उमेदवारीला जास्त मागणी आहे. राजीव देशमुख राष्ट्रवादीकडून आमदार असतांना थेट गिरणा नदीवरून फिल्टर प्लांट बसवून नागरिकांची कायमची पाण्याची गैरसोय दूर केली. खडकी बु.येथे एमआयडीसी उद्योग आणले. विकास कामे केली. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात शांतता नांदत होती, अशीही चर्चा सामान्य जनतेत आहे. मात्र, एकीकडे भाजपाचे आ. मंगेश चव्हाण पुन्हा आमदार होतील, अशीही जोरदार चर्चा आहे. आता चाळीसगावची जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते, हे आता आगामी काळच ठरविणार आहे. आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार, खासदार उन्मेष पाटील यांच्यापैकी कुणाच्या पारड्यात मतदार मते टाकून विजयी करतील, हे जनता जनार्दन ठरविणार आहेत, हेही तेवढेच खरे….!