दहा लाखाच्या निधी मंजूर
साईमत /पारोळा/ प्रतिनिधी
तालुक्यातील वंजारी(महाराणा प्रताप नगर) येथे गेल्या सात वर्षापासून स्मशानभूमीची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे.स्मशानभूमी बांधकामासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत व आमदार अमोल पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
तालुक्यातील वंजारी खुर्द महाराणा प्रतापनगर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्मशानभूमीची व्यवस्था नव्हती.
दीर्घकाळापासून स्मशानभूमीच्या अभावामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.येथील ग्रामस्थांनी या समस्येवर प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष ही वेधले.यासाठी काही वेळा उपोषण,आंदोलन केले तर १५ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने याकडे लक्ष वेधले.आमदार अमोल पाटील यांनी यासाठी शासनाकडे अहवाल सादर केला होता.
गावकऱ्यांच्या भावनिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन आज निधी मंजूर झाल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम हा पार पडला.याप्रसंगी जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील,तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शहरप्रमुख अमृत चौधरी,शेतकी संघाचे मा. अध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक नितीन सोनार,पंकज मराठे,आडगाव येथील महेश मोरे,मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील यांचेसह वंजारीचे सरपंच भैय्या राजपूत,उपसरपंच वनमाला राजपूत वंजारी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध झाल्याने भविष्यात अंत्यविधी दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर होणार असून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह,आनंद पसरून समाधान व्यक्त करण्यात आले.आनेक वर्षापासूनची या मागणीला पूर्णविराम लागला आहे.
ग्रामस्थांच्या भावना व न्याय देण्याची भूमिका जाणून आमदार अमोल पाटील यांनी १० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी आमदार अमोल पाटील यांचे आभार मानले आहेत.
