करवाढ न करता आर्थिक वर्ष २०२६-२७ ची तयारी पूर्ण
साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीच्या विशेष सभेत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. करवाढ न करता तब्बल १५२५ कोटी १२ लाख रुपये या विकासाभिमुख अर्थसंकल्पाची सादरीकरणे नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली आहेत.
महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी यापूर्वी १४५२ कोटी १० लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते, ज्यामध्ये कोणतीही करवाढ नव्हती. त्यानंतर स्थायी समितीने महसुलात सुधारणा आणि खर्चात आवश्यक बदल सुचविले. बुधवारी (दि. २५) पार पडलेल्या विशेष सभेत या दुरुस्तींसह अंतिम मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडलेल्या बैठकीला स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, लेखाधिकारी विजय सोनवणे आणि नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेत अंदाजपत्रकावर सखोल चर्चा करून विविध तरतुदींमध्ये आवश्यक बदल करण्यात आले.
मागील स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी २०२५-२६ चे सुधारित अंदाजपत्रक आणि २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावेळी ८ कोटी ५८ लाख रुपयांची शिल्लक दाखवत १४५२ कोटी १० लाख रुपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले होते. अधिक अभ्यासानंतर आजच्या विशेष सभेत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला.
आजच्या बैठकीत सभापती डॉ. पाटील यांनी मूळ अंदाजपत्रकात महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या. महसुली उत्पन्नात ५२ कोटी ५६ लाख ८६ हजार रुपयांची वाढ करण्यात आली, शहरातील मूलभूत सुविधांवरील खर्च वाढविला गेला, तर काही विभागांमध्ये खर्च कपात करण्यात आला. या सर्व बदलांनंतर दुरुस्तीसह १५२५ कोटी १२ लाख रुपये या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
महसुली वाढ आणि खर्चातील तपशील:
- महसुल जमा: ५२ कोटी ५६ लाख ८६ हजार रुपये वाढ
- महसुल खर्च: १३ कोटी ३२ लाख रुपये वाढ
- असाधारण देवघेव खर्च: ११ कोटी ३३ लाख ८५ हजार रुपये वाढ
- भांडवली खर्च: १९ कोटी ९५ लाख रुपये वाढ
- पाणीपुरवठा विभाग: ७ कोटी ८६ लाख ३२ हजार रुपये अतिरिक्त तरतूद
- एकूण खर्च वाढ: ५२ कोटी ४७ लाख १७ हजार रुपये
- जमा व खर्चातील तफावत: ९ कोटी ६९ लाख रुपये
या सुधारित अर्थसंकल्पामुळे नागरिकांना करवाढ न करता शहरातील विकास आणि मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याचा मार्ग खुला झाला आहे.
