Padalsare Project : पाडळसरे प्रकल्पाचा प्रधानमंत्री केंद्र कृषी सिंचन योजनेत समावेश

0
16

केंद्र शासनाची अंतिम मंजुरी–खा.स्मिताताई वाघ : शेतकऱ्यांसाठी जलक्रांतीचा नवा अध्याय

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : 

अमळनेर तालुक्यातील पाडळसरे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. प्रकल्पासाठी विविध टप्प्यांतील परवानग्या आवश्यक होत्या. प्रारंभी प्रकल्पाच्या तत्त्वतः मान्यतेसाठी तो पीआयबी (पब्लिक इन्व्हेस्टमेन्ट बोर्ड) कडे पाठवण्यात आला. पीआयबीने देशभरातील संबंधित विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे घेतली. त्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला.
अर्थ मंत्रालयाकडून आर्थिक दृष्टीने प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतर, संबंधित विभागांकडून त्यांच्या टिप्पणी व ना-हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता झाल्यावर अर्थ मंत्रालयाचे सचिव (खर्च) वुमलुनमांग वुअलनाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रकल्पास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आणि पुढील प्रक्रियेसाठी प्रकल्प जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आला.

अर्थ मंत्रालयाने प्रकल्पामध्ये काही तांत्रिक पूर्ततेविषयी सूचना दिल्या होत्या. त्या सर्व सूचनांची पूर्तता करून प्रकल्प पुन्हा जलशक्ती मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाकडून प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे अंतिम आर्थिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला. अर्थ मंत्रालयाने पूर्ण तपासणी करून अंतिम मंजुरी दिली व प्रकल्प पुन्हा जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवला. अखेरीस, जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश अधिकृतपणे घोषित केला. त्यामुळे हा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जलक्रांतीचा नवा अध्याय ठरला आहे.

प्रक्रियेमध्ये खा. स्मिताताई वाघ यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत, विविध मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकल्पाचे महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवले गेले. केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष संवादातून या प्रकल्पाची गरज अधोरेखित करत आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले. या सहकार्याच्या परिणामी आज उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा मोठा निर्णय प्रत्यक्षात उतरला आहे. प्रकल्पासाठी मागील २५ वर्षांपासून संघर्ष सुरू होता. आमदार असताना खा. स्मिताताई वाघ यांनी महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर या प्रकल्पाला मंजुरी मिळावी. म्हणून सातत्याने प्रयत्न केले, विविध बैठका घेतल्या. त्यानंतर खासदार झाल्यावर हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. प्रत्येक टप्प्यावर अडथळे आले, पण न थांबता, न थकता हे स्वप्न साकार करण्यासाठी त्या संघर्ष करत राहिल्या.

या निर्णयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री संकटमोचक ना.गिरीष महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.अनिल पाटील अशा सर्व मान्यवरांचे खा.स्मिताताई वाघ यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

…अखेर जनतेच्या इच्छेला न्याय मिळाला : खा. वाघ

आज जेव्हा प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्याचे जाहीर होत आहे, त्याक्षणी मन भावनांनी भरून येत आहे. हा क्षण केवळ वैयक्तिक समाधानाचा नाही तर उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अज्ञात संघर्ष करणारे लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या आशा-आकांक्षांचा विजय आहे. त्यामध्ये हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानते. हा दिवस खरंच सोन्याचा असल्याचे खा.स्मिताताई वाघ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here