साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
झारखंड राज्यातील गिरीडीह जिल्ह्यात असलेल्या ‘सम्मेदशिखर’ तसेच गुजरात राज्यातील ‘शत्रुंजय तीर्थ’ (पालिताना) अर्थात गिरनार या ठिकाणी संबंधित सरकारतर्फे पर्यटन स्थळ घोषित करण्यात आले असून झारखंड राज्यातील सम्मेदशिखर येथे वीस तीर्थकारांची मोक्षस्थळी असून समस्त जैन समाजाचे आस्थेचे केंद्र आहे. झारखंड राज्याने पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांमूळे मांस, मद्याचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते. तरी जैन समाज अनादीकाळापासून अहिंसेचा पूजारी असून अशा पवित्र स्थळाची पावित्र्यता नष्ट होईल हे विश्वातील जैन समाजास मान्य नाही.
ही बाब लक्षात घेता संबंधित राज्य सरकारने अध्यादेश त्वरित रद्द करावा या मागणीसाठी आज चाळीसगाव जैन समाजाच्या वतीने शहरातील अरिहंत मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय येथपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. तदनंतर तहसीलदार अमोल मोरे यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले, याप्रसंगी समस्त जैन समाजाचे अध्यक्ष डॉ सुनील जैन, संदीप दगडे, मनोज छाजेड, संजय टाटीया, किशोर सोळंकी, धनपती रताणी, प्रवीण छाजेड, महेंद्र आचलिया आदी समाज बांधव उपस्थित होते.