The Online Admission Process : अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अधिक सुकर करावी

0
33

जुक्टो संघटनेतर्फे जि.प.च्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाद्वारा राबविण्यास सुरुवात झाली आहे. आजतागायत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत.अद्यापही जळगाव जिल्ह्यातील कुठल्याही उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयात मंजूर विद्यार्थी संख्येइतके प्रवेश झालेले नाही. विशेषतः कला शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत नगण्य असल्याने असंख्य शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील यापुढील रिक्त जागांवरील संवर्गनिहाय प्रवेश तसेच संवर्गाची संख्या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित खुल्या वर्गातील प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांना देण्यात येऊन अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुकर करावी, अश आशयाची मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना यांच्यासह संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीने जळगाव जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच अशा आशयाची मागणी पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार सर्वश्री विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, किशोर दराडे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आजपर्यंतच्या तीनही फेऱ्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात विद्यार्थी संख्या दिली जात असल्याने इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल की नाही, त्याची भीती विद्यार्थ्यांसह पालक वर्गात निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अपूर्ण विद्यार्थी संख्येमुळे वर्गाध्यापनास नेमकी कधी सुरुवात होईल, याविषयी संभ्रम आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. प्रत्येक फेरीवेळी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया भाग दोन भरावा लागत आहे. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी सायबर कॅफेवरून अर्ज करत असल्याने त्यांना दरवेळी सायबर कॅफे चालकास शुल्क द्यावे लागत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालकांना यासंदर्भातील पुरेशी माहिती नसल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहे. असंख्य पालकांना आपला रोजगार बुडवून निव्वळ आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी वारंवार उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. हे प्रवेश व्यावसायिक अभ्यासक्रमाचे आहेत की, शालेय शिक्षणाचे आहेत…? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

निवेदनावर प्रा.नंदन वळिंकार,प्रा.सुनील सोनार, प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी. पाटील, प्रा.शैलेश राणे, डॉ.अतुल इंगळे, प्रा.पी.पी. पाटील,प्रा.मनिषा देशमुख, उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, प्रा.डी.वाय.पाटील, प्रा.राजेंद्र चव्हाण,प्रा.दिलराज पाटील, प्रा.गजानन देशमुख, प्रा. अर्जून मेटे,प्रा.प्रवीण पाटील, प्रा.धनराज भारुडे,प्रमोद लोंढे,प्रा.व्ही. व्ही.पाटील, डॉ.सी.वाय. पाटील,प्रा.विवेक पाटील, मलिक शरीफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here