dogs has increased : जिल्ह्याभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला

0
44

महिन्याभरात पाळीवसह भटक्या कुत्र्यांमुळे ७६६ जणांवर रुग्णालयात उपचार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागात एप्रिलमध्ये ८१४ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व संबंधित उपचार घेतल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयात ओपीडी काळात सकाळी ९ ते २ यावेळेत इंजेक्शन विभाग येथे विविध प्राण्यांच्या चाव्यावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घ्यायला नागरिक येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. रुग्णालयातील इंजेक्शन विभागात एप्रिल महिन्यात ७६६ व्यक्तींनी कुत्रा चावल्यामुळे उपचार घेतले आहे. त्यात ४८६ पुरुष, १५५ महिला तर १२५ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. त्यात महिन्याभरात ३४ रुग्णांना मांजर, ६ पुरुषांना उंदीर, एकाला माकड, ३ जणांना डुकर तर ३ जणांना माणसाने चावा घेतला असून एका महिलेला बोकडाने चावा घेतला आहे. अशा ४८ जणांवर उपचार केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, चावा घेतलेल्या रुग्णांमध्ये शहरातील रुग्णांची संख्या लक्षणीय ठरली आहे. त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचा संबंधित विभागाने विचार करुन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचा सूर शहरवासियांमधून उमटत आहे.

८१४ रुग्णांनी घेतले रेबीजचे इंजेक्शन

जळगाव जिल्ह्यात भटक्या व पाळीव प्राण्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात ८१४ रुग्णांवर रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेण्याची वेळ आली आहे. प्रशासनासह आरोग्य यंत्रणांनी यासंदर्भात कठोर पाऊले उचलावी, अशीही नागरिकांमधून मागणी होत आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा, स्वच्छ पाण्याखाली जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. सकाळी ओपीडी विभागात (क्रमांक १०९) तर दुपारी आपत्कालीन विभागाला कक्ष क्रमांक एकमध्ये भेट द्यावी, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here