साडे नऊ लाखांचा मुद्देमाल केला जप्त, उर्वरित संशयितांचा शोध सुरू
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील एमआयडीसी ई सेक्टरमधील ‘आनंद बॅटरी’ कंपनीत झालेल्या घरफोडीचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासात गुन्ह्याचा छडा लावत दोन अट्टल चोरट्यांना गजाआड केले आहे. पोलिसांनी चोरलेल्या ९ लाख ७० हजार रुपये किमतीच्या शिशाच्या प्लेट्ससह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील एमआयडीसी ई सेक्टरमधील आनंद बॅटरी कंपनीतून ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० ते १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बॅटऱ्या बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ९७ हजार रुपये किमतीच्या, ३२५ किलो वजनाच्या शिशाच्या प्लेट्स चोरीला गेल्या होत्या. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पीएसआय राहुल तायडे, चंद्रकांत धनके, स.फौ. विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पो.कॉ. नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, राहुल घेटे, किरण पाटील, नरेंद्र मोरे यांच्या पथकाची नेमणूक केली होती.
पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढली होती. तेव्हा हा गुन्हा जळगाव शहरातील अट्टल गुन्हेगार मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकाला तात्काळ तांबापुरा परिसरात जाऊन मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा याचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याचे साथीदार इम्रान सैय्यद हरुण (रा. नशिराबाद), रहीम उर्फ बाबल्या रशिद खान आणि मेहमुद उर्फ चिनी शेख मोहंमद यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले.
तीन चाकी रिक्षा हस्तगत
पथकाने तात्काळ इम्रान सैय्यद हरुण याचा नशिराबाद परिसरातून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यानेही चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चोरी झालेल्या ९७ हजार रुपये किमतीच्या ३२७ किलो वजनाच्या शिशाच्या १५ नग प्लेट्स आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली २ लाख रुपये किमतीची तीन चाकी रिक्षा हस्तगत केली आहे. मोहसिन उर्फ शेमड्या आणि इम्रान हरुण सैय्यद अशा दोघांना अटक केली आहे. तपास पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी करत आहेत.