सासरचा छळ : विवाहितेची वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी आत्महत्या
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सुंदरमोती नगरातील २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करुन ‘जीवन’ संपविले आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे मयुरी गौरव ठोसर असे नाव आहे. याप्रकरणी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मूळ रहिवासी असणाऱ्या मयुरीचा १० मे २०२५ रोजी जळगावातील गौरव ठोसरसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच तिचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर तिच्याकडून पैशांची मागणीही केली जात होती. मयुरीचा पती गौरव हा तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचे तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितले. अशा त्रासाला कंटाळून मयुरीने तिच्या आई-वडिलांना ही माहिती दिली होती. त्यांनी काही पैसे देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवसांनी पुन्हा छळ सुरू झाला.
मयुरीचा वाढदिवस मंगळवारी, ९ सप्टेंबर रोजी होता. तिच्या भावाने वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला पैसे दिले होते. तो साजराही झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घरात कुणी नसताना मयुरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह
स्वीकारणार नसल्याचा पवित्रा
अशातच मयुरीचे वडील भगवान बुडूकले यांना घटनेची माहिती मिळताच ते परिवारासह ११ सप्टेंबर रोजी जळगावात दाखल झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर मयुरीची आई, वडील आणि भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. आपल्या मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप करत त्यांनी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.



