एसपी राष्ट्रवादी पक्षाचा सोशल इंजिनिअरिंगचा अफलातून फार्मुला
साईमत विशेष प्रतिनिधी | जळगाव
जिल्ह्याच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नवनियुक्त शिलेदारांचा विचार केल्यास आगामी विधानसभा निवडणूकीच्या वातावरणाच्या ऐन भरात सामाजिक समीकरणावर भर दिला आहे. पक्षाने जिल्हाध्यक्ष मराठा,रावेर लोकसभेला कार्याध्यक्ष तेली, जळगावला माळी,महानगर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मुस्लिम,दोन कार्याध्यक्ष देतांना एक राजपूत आणि एक मराठा याप्रमाणे अफलातून सोशल इंजीरिंगचा फार्मुला असा मेळ साधत गुगली टाकली आहे.
मावळते जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्रभैय्या पाटील यांचा गेल्या सात वर्षाचा काळ पक्षाच्या पदरात काही ठोस पाडू न शकल्याने त्यांच्याविषयी उघड तक्रारी झाल्या.लोकसभेच्या पराभवाची कारणमिमांसा असणाऱ्या चालू सभेत तत्कालीन जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्रभैय्या पाटील आणि महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांना एकतर्फी पदमुक्त करण्याचा ठराव करणारा शरदचंद्र पवार पक्ष लोकशाही मानणारा पक्ष म्हणून जिल्ह्यात सिद्ध झाला होता. दरम्यान,नवीन पदाधिकारी नेमण्याची बैठक,त्यासाठी आलेले निरीक्षक माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे अहवाल पाठवून चेंडू प्रदेशाकडे टोलावणे, नंतर प्रदेशाध्यक्ष यांचे दौरे व लांबलेल्या नियुक्त्या यात पुलाखालून पाणी वाहत असताना माजी मंत्री सतिषअण्णा पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी प्रदेश पातळीवर रेटून ठेवत पाहिजे तशाच फार्मुल्याने आणि जातीय समीकरणाने नियुक्त्यांची घोषणा करून आणली.
काल मंगळवार,6 रोजी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदभार देण्याचा व सत्काराचा कार्यक्रम थाटात पार पडला. बैठकीत झालेली भाषणे आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आगामी धोरण नक्कीच पक्षाला अत्यंत पोषक वातावरण मिळवून देईल पण हे धोरण प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे काम तंतोतंत झाले पाहिजे. जिल्ह्यात महाविकास आघाडीने हातात हात घेऊन एकविचाराने काम केले तरच महायुतीच्या बलाढ्य ताकतीसमोर टिकाव लागेल अन्यथा ‘मन्ह मामानं घरं शंभर गायी, सकाळी उठून काई न माई…!’ असे चालणार नाही.
प्रमोदबापूंचे अत्यंत प्रभावी मुद्दे
जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्तीनंतर नेमका आपला अजेंडा प्रस्तुत करताना प्रमोदबापू पाटील यांनी संवाद यात्रा काढण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे.त्यानंतर तालुकास्तरीय नियुक्त्या आणि नंतर मेळावे असा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला आहे. संवाद यात्रेत सरकारच्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश करणे,नार – पार प्रकल्पाला केंद्राने नाकारलेली मंजुरी आपल्या जिल्ह्याला कशी घातक आहे, याचा उहापोह करून जनजागृती करणे, लाडली बहीण योजना फसवी असल्याचे निर्दर्शनात आणून देणे, प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून दादागिरी व दबावतंत्राचा चाललेला वापर झूगारून लावणे असा प्रमुख अजेंडा त्यांनी जाहीर केला असल्याने या प्रभावी मुद्द्याचं भांडवल केल्यास नक्कीच एसपी राष्ट्रवादी पक्षाला फायदा होणार आहे.रावेरचे कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी,जळगाव लोकसभेचे शालिग्राम मालकर आणि जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक यांच्यातील संघटन खुबीचा वापर झाला पाहिजे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या नव्या दमाच्या नव्या शिलेदारांना प्रोत्साहन दिले पाहिजे.