संजय राऊतांच्या घरात ईडीचे पथक घुसले. त्यांना अटक झाली. अशा तपास यंत्रणांची झुंडशाही आणि दिल्लीश्वरांच्या हुकूमशाहीचे हे शेवटचे टोक आहे. सत्य व परखड बोलणाऱ्यांच्या जिभाच छाटायच्या किंवा नरडी आवळायची. हे असले दळभद्री प्रकार इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीतही घडले नव्हते असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखात करण्यात आला. ज्या देशात राजकीय विरोधकांशी सन्मानाने वागले जात नाही त्या देशात लोकशाही व स्वातंत्र्याचे मोल संपते व नंतर देश संपतो अशी टीकाही करण्यात आली.
तुरुंगही कमी पडतील
महाराष्ट्रावर एकापाठोपाठ घाव घातले जात असून महाराष्ट्र तोडण्याआधी शिवसेनेला संपवायलाच हवे. त्यासाठी तर फोडाफोडी, दहशत निर्माण करायची, महाराष्ट्र काय किंवा शिवसेना काय कधीही झुकणार नाही. संजय राऊतांसारखे किती जणांना तुरुंगात टाकाल? तरी तुरुंग कमी पडतील. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आलेले नाही. शिवरायांचे हे राज्य बुडावे, त्याआधी ते नामर्द करावे असे कुणास वाटत असेल तर ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील!
नीच पातळीवर पोहचले
महाराष्ट्राचे व देशाचे एकंदरीत राजकारण खालच्या पातळीवर नेऊन ठेवले गेलेच होते. पण ते आता किती नीच पातळीवर पोहोचले आहे ते दिसू लागले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ‘ईडी’ने अटक करताच शिंदे गटातील आमदारांनी आनंद व्यक्त केला तर भाजपच्या लोकांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर कमाल केली, “कर नाही त्याला डर कशाला’’ असे साळसूदपणे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. ‘
वाॅशिंग मशीनमध्ये शुद्ध झाले असते
ईडी’ला घाबरून पळ कोणी काढला व दिल्लीत जाऊन कसे कोण शरणागत झाले हे देशाने पाहिले आहे. संजय राऊत हे भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये जाऊन शुद्ध, स्वच्छ झाले असते तर त्यांच्यावर हे अटकेचे व छळाचे संकट ओढवले नसते. श्री. राऊत यांच्यावरील कारवाई आकसाने, राजकीय सूडापोटीच करण्यात आली आहे. त्यांना गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणाचे सूत्रधार ठरवण्यासाठी अनेक खोटे पुरावे उभे केले गेले. त्यांच्या घरावर धाड टाकली.
दळभद्री प्रकार तेव्हा झाले नाही
मुळात कायदा व नियम या देशात राहिलाच नव्हता, पण आता राज्यघटना, लोकशाही वगैरे शब्दांचेही रोज हत्याकांड होत आहे.रविवारी पहाटे ‘ईडी’ची पथके राऊत यांच्या घरात घुसली व त्यांना ताब्यात घेतले ही तर तपास यंत्रणांची झुंडशाही व दिल्लीश्वरांच्या हुकूमशाहीचे शेवटचे टोक आहे. सत्य व परखड बोलणाऱ्यांच्या जिभाच छाटायच्या किंवा नरडी आवळायची. हे असले दळभद्री प्रकार इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीतही घडले नव्हते. ज्या देशात राजकीय विरोधकांशी सन्मानाने वागले जात नाही त्या देशात लोकशाही व स्वातंत्र्याचे मोल संपते व नंतर देश संपतो.
राऊतांनी लिहिले होते पत्र
संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वी एक खळबळजनक पत्र राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिले. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा. अन्यथा परिणाम वाईट होतील. तुमच्यामागे चौकशांचा ससेमिरा लावला जाईल, असे सांगण्यासाठी दिल्लीतील काही प्रेमळ लोक राऊतांच्या घरी पोहोचले.
शांत झोप काळझोप ठरेल
राऊत यांनी नकार देताच त्यांनी ही कारवाईची व धमकीची तलवार ज्यांच्या मानेवर ठेवली त्यांनी आता ठाकऱ्यांचे सरकार पाडले आहे. ही क्रोनोलॉजी समस्त देशवासीयांनी समजून घेतली तर आपल्या देशात नक्की काय सुरू आहे याची कल्पना येईल. भाजपमध्ये गेल्याने शांत झोप लागते. ईडी, सीबीआयची भीती नाही, असे हर्षवर्धन पाटलांसारखे लोक सांगतात. तेच आजचे सत्य आहे. पण ही शांत झोप देशासाठी काळझोप ठरेल व संपूर्ण देश दहशतीच्या अंधारयुगात लोटला जाईल असे वातावरण आहे.