राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनात उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
समाज बदलण्यासाठी फक्त शब्द किंवा बाईट पुरेशी नाही. त्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता असल्याचे यावर्षी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनात अधोरेखित केले. ज्या क्रांतिकारी योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केल्या. त्यांचा वापर आळशीपणे बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी संविधानाची पूजा करून भक्त तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आज धोक्यात आहे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे जनतेला सामूहिक उठाव करुन रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले. राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन व संविधान गीत यांच्या माध्यमातून झाली. संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगकवी संपत सरल, न्या.बी.जे. कोळसे पाटील, श्रीधर अंभोरे, निरज जैन, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योजक संजय इंगळे, ॲड. राजेश झाल्टे, गौतम खंडारे, शालिग्राम गायकवाड, खलील देशमुख, वासंती दिघे, मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, स्वागताध्यक्ष करीम सालार, भारती रंधे, जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागूल, सत्यजित साळवे यांचा समावेश होता.
डॉ. मिलिंद बागूल यांनी संमेलनाचे उद्दिष्ट स्पष्ट करत सांगितले की, संविधानाचे रक्षण करणे आणि त्याचे महत्त्व जनजागृतीद्वारे पोहचवणे हे प्रमुख हेतू आहेत. स्वागताध्यक्ष डॉ. करीम सालार यांनी बाबासाहेब जळगावकरांच्या नेतृत्वाखाली संविधान रक्षणाच्या लढाईत अभिमान वाटत असल्याचे व्यक्त केले. मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी सांगितले की, सध्या संविधानाचा अपमान थांबवण्यासाठी आम्ही हे संमेलन घेऊन आहोत.
माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांनी संविधान अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने रस्त्यावर उतरून लढणे आवश्यक असल्याची आग्रही भूमिका मांडली. व्यंगकवी संपत सरल यांनीही आपल्या व्यंगकवितांमधून संविधान विरोधी वातावरणावर घणाघाती टीका करुन संविधानाचा सन्मान फक्त सोशल मीडियावरून मिळणार नाही तर जमिनीवर, रस्त्यावर उतरून लढले पाहिजे, असे सांगितले.
सन्मान पुरस्कारासह पुस्तकांचे प्रकाशन
कार्यक्रमात राज्यस्तरीय संविधान सन्मान पुरस्कार डॉ. श्रीराम सोनवणे, प्रा. अशोक पवार, कांता रमेश अहिरे, शीला मुरलीधर पवार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. मिलिंद बागूल लिखित ‘परिवर्तन साहित्य आणि समीक्षा’, ‘परिवर्तन समीक्षा आणि विचार’, अ.फ. भालेराव लिखित ‘खिचडी’, डॉ. मारुती कसाब लिखित ‘गुरु गौरव’ आदी पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी चेतन नन्नवरे, महेंद्र केदार, अनिल सुरडकर, बापू शिरसाठ, सुभाष सपकाळे, चंद्रशेखर अहिरराव, साहेबराव बागुल, दत्तू सोनवणे, गौतम खंडारे, शालिक गायकवाड, वासंती दिघे, खालील देशमुख यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील तर आभार डॉ. सत्यजित साळवे यांनी मानले.
