गणपूर शाळेत महावाचन प्रकल्पाअंतर्गत लेखक राजेंद्र पारे यांचे प्रतिपादन
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
स्वतःला परिस्थितीशी झगडत यशस्वी शिखर गाठणाऱ्या बालकाची गोष्ट म्हणजेच ‘धावपट्टीवरचा अनोखा प्रवास’ ही कादंबरी होय. हरलेल्या परिस्थितीत तो बालक पुढे इतरांसाठी आदर्शवत ठरला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार न मानता झगडत राहिले पाहिजे. त्यामुळे यश हमखास मिळते.
वाचनाने माणसात प्रगल्भता वाढते. मन समृद्ध होते. त्याची विचार करण्याची क्षमता वाढते. वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. म्हणून विद्यार्थी दशेतून अवांतर वाचनाची गोडी लावली पाहिजे, असे प्रतिपादन लेखक राजेंद्र पारे यांनी केले. चोपडा तालुक्यातील गणपूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा येथे वाचन संस्कृतीचा विकास व्हावा, या उद्देशाने महावाचन प्रकल्पाअंतर्गत राजेंद्र पारे लिखित ‘धावपट्टीवरचा अनोखा प्रवास’ पुस्तकाचे वाचन उपशिक्षक शुभांगी भोईटे यांनी ३२ भागात केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
परिपाठावेळी दहा मिनिटे वाचन करून त्यावर प्रश्न विचारण्यात येत होते. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आले. मिळणाऱ्या बक्षिसामुळे मुलांमध्ये स्पर्धेसाठी चढाओढ निर्माण झाली. ते लक्षपूर्वक श्रवण करू लागले. दिवसागणिक प्रतिसाद वाढू लागला. पूर्ण कादंबरी वाचन झाल्यानंतर त्यावर आधारित लेखी चाचणीचे नियोजन करण्यात आले. मुक्त वातावरणात चाचणी घेण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्यांना शाळा व्यवस्थापन समितीतील शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक ॲड.बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते रोख रक्कमेसह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ॲड.बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.