जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी नगरातील २४ वर्षीय रामेश्वर लक्ष्मण भोई या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी, ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली. विशेष म्हणजे, पंढरपूरहून विठूरायाचे दर्शन घेऊन परतलेल्या आईला मुलाने आत्महत्या केल्याचे चित्र समोर दिसून आले. या घटनेनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नियतीने क्रूर डाव साधून आईच्या आयुष्यात न भरून येणारा अंधार पसरला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पांडुरंगाच्या भेटीसाठी रामेश्वरची आई मंगला भोई ह्या काही दिवसांपासून पंढरपूरला गेल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भेटण्याच्या ओढीने त्या घरी परतल्या. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजारी राहणाऱ्या काही तरुणांनी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आईच्या समोर मुलगा रामेश्वरने गळफास घेतल्याचे दृश्य समोर दिसले. एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच आईने हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
रामेश्वर आणि त्याची आई हे दोघेच एकमेकांचा आधार होते. रामेश्वर हा केळकर मार्केटमधील एका कापड दुकानावर कामाला होता. आई पंढरपूरला गेली असल्याने रामेश्वर घरी एकटाच होता. ७ जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे कामाला गेला आणि सायंकाळी घरी परतला. त्यानंतर मध्यरात्री त्याने घरातील छताला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
आईच्या जीवनात उरले केवळ दु:ख
रामेश्वरच्या त्याच्या मृत्यूमुळे मंगलाबाईंच्या आयुष्यात आता केवळ दुःख उरले आहे. ज्या मुलासाठी त्या जगल्या तोच आता त्यांच्यासोबत नाही, अशा वास्तवाने त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई आणि विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. रामेश्वरच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.