The Morning Thrill : पहाटेचा थरार : अज्ञात मारेकऱ्यांनी तरूणाला धाडले ‘यमसदनी’

0
15

खुनाच्या घटनेने जळगाव हादरले…! पोलिसांपुढील गुन्हेगारी प्रवृत्तीचे आव्हान कायम

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या जळगावात पुन्हा रामेश्वर कॉलनीतील एका तरूणाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे. दरम्यान, ‘तरुणा’वर अज्ञात ६ ते ७ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला संपवून ‘यमसदनी’ धाडले आहे. हा थरार पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे जळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचा सूर जनसामान्यांमधून उमटत आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर असे की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची (बंसवाल) नावाच्या तरुणाची सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता दिक्षीतवाडी शेजारील वीज महावितरणच्या कार्यालयाजवळ निर्घृण हत्या झाली आहे. विशाल हा वेल्डींगच्या दुकानावर काम करुन परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. सोबत तो सोलर पॅनेलचे बेस बसविण्याचे कामही करत होता. अशातच रविवारी, १७ ऑगस्ट रोजी तो रात्री काम उरकवून तुकारामवाडी येथील त्याच्या काकांच्या घरी रात्री थांबला होता. दरम्यान, मध्यरात्री परिसरात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे विशाल हा त्याच्या काकांचा मुलगा आकाश जनार्दन मोची आणि मित्र राहुल भालेराव हे तक्रार करण्यासाठी वीज महावितरणच्या कार्यालयात गेले होते. वीज महावितरणाच्या कार्यालयाकडे जात असताना रस्त्यामध्ये संशयित आरोपी भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (रा. पिंप्राळा) यांच्यासह तीन ते चार जण हे रस्त्यात वाढदिवस साजरा करत असल्याचे त्यांना दिसले. मात्र, त्यांनी तेथे दुचाकी न थांबवता वीज महावितरणाच्या कार्यालयाकडे निघाले होते. यावेळी संशयित आरोपींनी विशाल मोची, आकाश मोची आणि रोहित भालेराव यांचा पाठलाग सुरू केला.

संशयित आरोपींनी दुचाकीवरुन ‘विशाल’ला ओढून पाडले खाली

मटन मार्केटच्या पुढे महावितरणाच्या कार्यालयाजवळ संशयित आरोपींनी मागे बसलेल्या विशालला ओढून खाली पाडले. त्यानंतर धारदार शस्त्राने मानेवर, डोक्यावर, छातीवर वार केले. तसेच इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. त्यावेळी ते जोरजोराने आरडाओरडा करून, “आमच्यावर एमपीडीए लावता का ? एकेकांना आम्ही मारून टाकू, आम्ही भूषण भाचाचे साथीदार आहोत”असे म्हणून मारहाण केली.

परिवाराचा हेलावणारा आक्रोश

विशालच्या मानेवर, हातावर, छातीवर वार झाल्यामुळे तो जागीच कोसळला तर आकाश आणि रोहित हे तिथून पळायला लागले तर संशयित आरोपींनी दोघांना पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि चाकूने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करुन पळून गेले. घटना घडल्यानंतर आकाशने घरी फोन करून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विशालला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी परिवाराने केलेला आक्रोश हेलावणारा होता. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांसह मित्र परिवारानेही गर्दी झाल्याचे चित्र होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी जाणून घेतली घटनेची माहिती

घटनेची माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कळताच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शहरातील रामेश्वर कॉलनी येथे विशाल हा वास्तव्यास होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ उदय आणि एक विवाहित बहीण असा परिवार असल्याचे सांगण्यात आले. जखमी विशाल मोची, आकाश आणि रोहित हे यापूर्वी खून झालेल्या सुरज ओतारीचे मित्र आहेत, त्याचाही राग मनात धरून संशयित आरोपींनी हा प्राणघातक हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास एपीआय सचिन चव्हाण करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here