भाजपमधील नवइच्छुकांचा ‘मूड’ खराब होण्याची शक्यता

0
70

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षात अनेक इच्छूक

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी

पितृपक्ष आटोपल्यानंतर आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आपआपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी खलबते सुरु झाली आहेत. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षात अनेक इच्छूक आहेत. काही इच्छुकांनी प्राथमिक तयारीही सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्याबाबतीत सांगायचे झाल्यास भाजपाचे चार विद्यमान आमदार आहेत. चार जागा व्यतिरिक्त रावेर-यावलच्या जागेसाठी पक्ष योग्य व तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. तथापि, ज्या चार जागांवर भाजपचे आमदार आहे. त्यात जळगाव शहर, जामनेर, भुसावळ आणि चाळीसगाव या जागांचा समावेश असून या चारही जागांवर विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी द्यावी, असा प्रवाह पक्षश्रेष्ठींमध्ये आहे. तसा या चारही जागांना कुठलाही धोका नाही. त्यामुळे नवीन उमेदवार देण्याचा विचार तुर्त तरी मागे पडला आहे. मंगळवारी भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून प्रत्येक जागा महत्त्वाची असून निवडून येण्याचे मेरीट महत्त्वाचे मानल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सूत्रांचे म्हणणे ग्राह्य धरले तर भाजपमधील नवइच्छूकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. मंगळवारी या चारही विधानसभा क्षेत्रात पक्ष निरीक्षक येवून गेले व त्यांनी पक्षांतर परिस्थितीचा अंदाजही घेतला. चारपैकी फक्त जामनेरमधून मंत्री गिरीष महाजन व्यतिरिक्त कुणीही इच्छूक नाही, हे विशेष होय. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या चारही आमदारांनी पक्षाच्या उमेदवारास चांगले मताधिक्य मिळवून दिले. जळगाव शहर, जामनेर, भुसावळ आणि चाळीसगाव या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मते भाजपाच्या लोकसभा उमेदवारांना मिळाली. त्यामुळे जळगाव आणि रावेरची लोकसभेची निवडणूक पक्षाने लक्षणिय मताधिक्क्याने जिंकली. त्यामुळे पक्षाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी निश्चित करतांना हा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे. विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी फार कष्ट धेण्याची गरज भासणार नाही, असे पक्षश्रेष्ठी अंतर्गंत मानले जात आहे.

सर्वाधिक इच्छूक जळगाव शहरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवार जळगाव शहरातून आहेत. एकूण सहा नावे पक्षाकडे सादर केली गेली आहेत. तर त्यापाठोपाठ रावेर-यावल मतदारसंघातून चार जण तर भुसावळ आणि चाळीसगावमधून प्रत्येकी दोन इच्छूक आहेत. पक्षाचे जामनेर, जळगावसह जे चार विद्यमान आमदार आहेत त्यांची पक्षांतर्गंत स्थिती मजबूत असून कार्यतत्परता ही लक्षणिय आहे. तसेच त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे. त्यामुळे नव्यांना संधी मिळेल, याबाबत शाश्वती वाटत नसली तरी पक्षश्रेष्ठी उमेदवारीबाबत काय निर्णय घेता, ते यथावकाश कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here