आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीत वैद्यकीय अधिकारीच ‘गैरहजर’

0
13

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर

येथील गावाबाहेर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन दिवसांपूर्वी एका बाळंतीण झालेल्या आदिवासी महिलेचा वेळेत उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच जिल्हास्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी ‘गैरहजर’ राहिल्याने यांना कामाचे व आपल्या जबाबदारीचे कोणतेही सोयर सुतक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गावाबाहेर धानोरासह परिसरातील आदिवासी पाडे, वस्ती येथील रुग्णांना चांगली सेवा मिळावी, म्हणून भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर त्याचप्रमाणे परिसरातील उपकेंद्रात तीन डॉक्टर नियुक्त केले आहे. येथे वैद्यकीय अधिकारी निवासस्थान असूनही एकही अधिकारी निवासस्थानात राहत नसल्यामुळे कुंड्यापाणी, ता.चोपडा येथील नबाबाई समीर तडवी (वय 28) या बाळंतीण झालेल्या आदिवासी महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच आरोग्य केंद्रांतर्गत घडली आहे. दरम्यान, या घटनेचा आदिवासी संघटनेकडून आणि विविध संघटनांकडून आणि जनमानसाकडून संताप आणि रोष व्यक्त होत आहे.

दोन दिवसात अहवाल देणार : डॉ.धापटे

जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.धापटे, जिल्हा पर्यवेक्षक राजेश कुमावत, लिपिक नितीन सोनवणे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेव्हा येथे वैद्यकीय अधिकारीच गैरहजर असल्यामुळे अधिकाऱ्यांनीही तीव्र शब्दात झालेल्या घटनेची नाराजी व्यक्त केली. तसेच एका आदिवासी महिलेचा उपचाराविना झालेला मृत्यूची घटना अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे या घटनेचा सविस्तर अहवाल दोन दिवसात वरिष्ठांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.धापटे यांनी दै.‘साईमत’ला सांगितले.

‘हम करे सो कायदा’प्रमाणे कामकाज

आरोग्य केंद्रातील गैरप्रकाराबाबत यापूर्वीही अनेकवेळा ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र, येथील नियुक्तीच असलेले वैद्यकीय अधिकारी ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने आपले कामकाज करीत आहे. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना धानोरा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्र देऊन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here