२० मिनिटांत लेवा बोर्डिंगवरील कचरा हटवला, नागरिकांचे आभार
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहराच्या मध्यवर्ती भागातील लेवा बोर्डिंग सभागृहाबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शनिवारी सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सभागृहाजवळील साफसफाई केली, मात्र गोळा केलेला कचरा सभागृहाच्या मुख्य दरवाजाजवळच ढिगाऱ्याच्या स्वरूपात ठेवून कर्मचारी निघून गेले. स्थानिक नागरिकांनी दुपारी १ वाजेपर्यंत कचरा उचलण्याची विनंती केली, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
उद्घाटनासाठी सभागृहात पोहोचताच महापौरांनी कचऱ्याचे साम्राज्य पाहून नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी परिस्थितीची माहिती दिली आणि महापौरांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोग्य विभागाला कचरा उचलण्याचे आदेश दिले.
महापौरांच्या तत्परतेनंतर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई केली. अवघ्या अर्ध्या तासात महापालिकेचे कर्मचारी आणि कचरा उचलणारे वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि ढीग २० मिनिटांत पूर्णपणे साफ करण्यात आला. नागरिकांनी महापौरांची तत्परता आणि कारवाईबद्दल आभार मानले.
महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाला स्पष्ट ताकीद दिली आहे की संपूर्ण जळगाव शहरात साफसफाई वेळेवर केली पाहिजे. केवळ कचरा झाडून त्याचे ढीग लावू नयेत; झाडलेला कचरा एका तासाच्या आत तिथून उचलला गेला पाहिजे. या कारवाईमुळे कामात ढिलाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये महापौरांच्या कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त होत आहे, तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये साफसफाई प्रक्रियेत जबाबदारीची जाणीव वाढण्याची अपेक्षा आहे.
