साईमत/ न्यूज नेटवर्क । लोहारा, ता.पाचोरा ।
येथील नवीन बांधकाम सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरुन अज्ञात चोरट्यांनी नऊ हजारांचे साहित्य लांबविल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लोहारातील नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सुरू होऊन त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून पूर्णपणे झाली आहे. सोलर पॅनलही लावलेले आहे. त्याची उर्वरित कामे करण्यासाठी सनस्रोत टेक्नॉलॉजी कंपनीचे कर्मचारी सोलर सिस्टिमकडे गेल्यावर सोलर सिस्टिमचे केबल, आर्थिंग रॉड, डीसी केबल, पीव्हीसी पाईप हे लावलेले दिसत नाही. म्हणून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक महेंद्र बागुल यांना सांगितले. ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तिथे गेल्यावर साहित्य दिसून आले नाही. याबद्दल त्यांनी सर्व हॉस्पिटलमधील स्टॉपला याबद्दल विचारणा करून माहिती दिली. तसेच सर्वांनी गावातही विचारपूस केल्यावर वस्तू मिळून आल्या नाहीत. म्हणून अज्ञात चोरट्यांनी साहित्य चोरून नेल्याची खात्री झाली आहे.
नऊ हजाराचे साहित्य लांबविले
चोरट्यांनी एक हजार ८०० रूपये किमतीची आर्थिंग केबल १६ एमएमची काळ्या रंगाची, एक हजार दोनशे रुपये किमतीची आर्थिंग केबल दहा एमएमची काळ्या रंगाची, तीन हजार रुपये किमतीची आर्थिंग रॉड तीन नग सिल्वर रंगाची, तीन हजार रुपये किमतीची डीसी केबल चार एमएमची १०० फूट, पाचशे नऊ रुपये किमतीची पीव्हीसी पाईप सहा नग २५ एमएमचे पांढऱ्या रंगाचे असा नऊ हजार ५०९ रुपये किमतीचे साहित्य लांबविले आहे. गेल्या ३ मार्च २०२४ ते २४ जून २०२४ दुपारी १२ वाजे दरम्यान लोहारा सिव्हिल हॉस्पिटलमधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने साहित्य लांबविले आहे. तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरविंद मोरे करीत आहे.