नाचणखेड्यातील दोन्ही जिगरी मित्रांचे ‘भाग्य’ उजाळले…!

0
48

एकाला पोलीस खात्यात मिळाली ‘खाकी’ तर दुसरा बनला आरोग्य खात्याचा ‘सेवक’

साईमत/पहुर,ता.जामनेर/प्रतिनिधी :

‘भगवान के घर देर है…पर अंधेर नही’ अशा उक्तीची प्रचिती येऊन जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील दोघेही जिगरी मित्र एकाच दिवशी नोकरीला लागल्याचा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करुन जिद्दीमुळे दोन्ही मित्रांचे ‘भाग्य’ उजाळले आहे. याबद्दल गावातील सरपंच हर्षल चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी दोघांचा नुकताच सत्कार केला. हलाखीच्या जीवनातील दोघांचेही अनुभव महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती युवा कीर्तनकार ह.भ.प. अविनाश महाराज चौधरी (नाचणखेडेकर) यांनी ‘साईमत’ला दिली.

जामनेर तालुक्यातील पाळधी येथून जवळील नाचणखेडा येथील सागर तानाजी चौधरी हा वयाच्या १८ व्यावर्षापासून स्पर्धा परीक्षांचा सराव करत होता. त्याने अनेक ठिकाणी परीक्षा दिल्या. अनेक ठिकाणी ग्राउंड झाली. परंतु नशीब साथ देत नव्हते. त्यातच वयाच्या २२व्यावर्षी मोठ्या भावाचे छत्र हरपले. पुन्हा वयाच्या २६ व्यावर्षी वडिलांचे छत्र हरपले. अशा दोन्ही घटना त्याच्या जीवनात हृदयाला धक्का देणाऱ्या ठरल्या होत्या. त्यानंतर फक्त आई…ती पण दु:खी-सुखी अशा परिस्थितीत ‘सागर’ डगमगला नाही. कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेला नाही. संपूर्ण शेतीचा व्यवसाय पाहून आणि दररोजची प्रॅक्टिस दररोजचा अभ्यास नियमितपणे त्याने केला. आज खरं पाहता भगवंताने त्याच्या यशाला फळ मिळाले आहे. त्याने पोलीस खात्यात ‘खाकी’ मिळविली आहे. आता तो नंदुरबारला पोलीस झाला आहे.

खचून जाणाऱ्या युवकांनी दोघांचा आदर्श घ्यावा

‘सागर’चा मित्र राहुल शांताराम कोळी यानेही वयाच्या १९ व्या वर्षापासून अभ्यास सुरू केला होता. वयाच्या २५ व्यावर्षी त्याच्या जीवनातून आईचे छत्र हरपले होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. पत्नीचे निधन झाले म्हणून राहुलचे वडील फार खिन्न झाले होते. अशावेळी राहुलने वडिलांना धीर देत अनेक स्पर्धेच्या परीक्षा दिल्या. अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. परंतु बहुतांश परीक्षांमध्ये एक मार्काने, दोन मार्काने नोकरी हातातून जात होती. मात्र, त्याने जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर अभ्यास करुन अखेर आपले ध्येय गाठले आहे. त्याला आरोग्य खात्यात नोकरी मिळाली आहे. आता तो नागपुरला ‘आरोग्य सेवक’ बनला आहे.

अशा दोन्ही जिगरबाज मित्रांनी खचून न जाता ध्येय गाठले आहे. त्यांच्या यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. खचून जाणाऱ्या युवकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असाच सूर नाचणखेड्यातील ग्रामस्थांमधून उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here