पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरत्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाळधी येथे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक फिरत्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच पाळधी गाव व परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गरजूंची सेवा करणे हेच आमचे खरे व्रत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, या ध्येयाने शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. आज या फिरत्या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारातच आरोग्यसेवा पोहोचत असून, जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस आरोग्यसंपन्न होत नाही तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार आहे. त्यामुळे ही ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘मायेची दृष्टी’ ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, आतापर्यंत रुग्णांना नेत्र तपासणीसाठी पाळधी येथे यावे लागत होते. मात्र ग्रामीण भागातील वृद्ध, अशक्त व गरजू रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन आता ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण आरोग्यसेवेला मोठी चालना मिळेल. पाळधी व परिसरात नुकतीच पूर्ण झालेली विविध विकासकामे परिसराचा काया पालट करणारी ठरली असून, या कामांमुळे विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील खरे ‘दृष्टीदाता’ – ग्रामस्थांची भावना
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुपने उल्लेखनीय सामाजिक कार्य उभारले आहे. आतापर्यंत ३३ मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात येऊन तब्बल २९,२६० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १०,९४० मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या उल्लेखनीय कार्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी “पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दृष्टीदाता आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या.
विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
यावेळी पाळधी खुर्द, पोखरी, पोखरी तांडा, पाळधी बु., पोखरी–वराड रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मराठी व उर्दू शाळांसाठी नव्या खोल्यांचे बांधकाम, पाळधी खुर्द येथे संविधान भवन, विविध ठिकाणी ब्लॉक बसविणे, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना हॉल तसेच एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण अशा अनेक विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जीपीएस ग्रुपमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. जनतेच्या विश्वासामुळेच हे सेवायज्ञ अखंड सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीएस ग्रुपचे सदस्य प्रशांत झंवर यांनी केले तर आभार प्रदर्शन जीपीएस स्कूल कॅम्पचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाला पाळधी बु. सरपंच विजय पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी, उपसरपंच निसार शेख, लोकप्रतिनिधी, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
