For Ozone Protection : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृतीचा वसा : ओझोन संरक्षणासाठी ‘जनसहभागाची’ हाक

0
21

राष्ट्रीय हरित सेनेतर्फे खुबचंद सागरमल विद्यालयात ओझोन दिनानिमित्त मार्गदर्शन 

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील खुबचंद सागरमल विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग आणि राष्ट्रीय हरित सेनेतर्फे जागतिक ओझोन दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाद्वारे ओझोनच्या संरक्षणासाठी जनसहभागाची हाक दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीचा वसा घेतला. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील, एल. एन. महाजन यांनी ओझोन थराचे महत्त्व आणि त्याच्या संवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका कल्पना देवरे, योगेंद्र पवार, संजय पाटील यांच्यासह राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

ओझोन दिवस आपल्याला पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देतो. भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी पृथ्वी हवी असेल तर प्रत्येकाने ओझोन थर वाचविण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्यामुळे ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात भारत सरकारने पर्यावरण जनजागृतीसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय हरित सेना योजनेची माहितीही देण्यात आली.

सर्वांनी एकमुखाने घेतली प्रतिज्ञा

शाळांमध्ये हरित सेना, इको क्लब स्थापन करून वृक्षारोपण, पाणी बचत, स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण अशा उपक्रमात विद्यार्थी सहभागी होतात. पोस्टर स्पर्धा, फेरी, नाटिका, प्लास्टिकविरोधी अभियानाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण होतात. शेवटी ओझोन थराचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे हेच आपले कर्तव्य आहे, अशी उपस्थितांनी एकमुखाने प्रतिज्ञा घेतली. यावेळी प्लास्टिकचा वापर कमी करणे, झाडे लावणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, वीज व इंधन बचत करण्यावर भर देण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना योजनेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम व जबाबदारीची भावना निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here