साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या २१ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे केला होता. आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन यानिर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केले आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाज बांधवांच्यावतीने चित्रपट अभिनेते व सहकारी यांचे स्वागत करून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
“संघर्षयोद्धा“ हा माझा पहिलाच बायोपिक आहे. याआधी मी मुसंडी, मजनू , खळगं असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनविणे हे जरा सोपे असते. कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो. परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट हे तेवढेच कठीण असते. त्यामुळे हा चित्रपट बनविणे माझ्यासाठी मोठे आवाहन होते. पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली. हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो. त्यामुळेच हे मी शिवधनुष्य पेलू शकलो, असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले.
मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की, मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली. आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका मी केल्या आहेत. पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खुप काही देऊन गेली आहे. संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहचलेले आहेत. त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे. सर्व समाजातील लोक हा चित्रपट नक्कीच जाऊन पाहतील, अशी मला खात्री असल्याचे अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितले
मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर आहे. संपूर्ण जगाला समजावा, यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत, ही छोटी गोष्ट नाही. त्यांनी आजवर अनेक उपोषण केली हार मानली नाही. माझे मी भाग्य समजतो की, या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली, असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले.