स्त्रीशक्तीच्या हस्ते प्रकाशन ; समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे येत्या १८ जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या दहाव्या ऋणानुबंध वधु-वर व पालक परिचय मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जुने एम्प्लॉयमेंट ऑफिससमोरील अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेत सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता अर्ज वितरण, ऑनलाईन प्रणालीसह कार्यक्रम पत्रिकेचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुवर्णकार समाजातील स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधी भगिनींच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
सोहळ्याला अहिर सुवर्णकार महिला मंडळ, मेळावा सहयोगी सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशा उपक्रमाद्वारे समाजातील युवक-युवतींसाठी विवाहयोग्य परिचयाची एक भक्कम आणि पारदर्शक व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे. नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर होणाऱ्या सोहळ्यास समाजबांधवांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन महाराष्ट्र सुवर्णकार सेना, मेळावा समितीच्या सदस्यांनी केले आहे.