छायाचित्रे काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा लाडका दिवस : ‘छायाचित्र दिन’
असे म्हणतात की, १ हजार शब्द जेवढे सांगू शकत नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त एक ‘छायाचित्र’ सांगून जाते. तेवढे सामर्थ्य एका छायाचित्रात अर्थात फोटोत असते. म्हणूनच, प्रत्येक छायाचित्रकार एक कलाकार असतो. अनेक छायाचित्रांना तो बोलकं करतो. छायाचित्रण कलेला प्रोत्साहन देणे हाच छायाचित्र दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. त्यानिमित्त यादिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. छायाचित्रण प्रदर्शनही आयोजित केले जाते. ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी ‘क्लिक’ केलेले दुर्मीळ फोटो कार्यक्रमात प्रदर्शित केले जातात. जगभरातल्या छायाचित्रे काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस मानला जातो. यंदाही मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक छायाचित्र दिन’ आहे. अशा दिवसाला सगळे छायाचित्र काढणारे कलाकार, घराबाहेर पडून आपली आवड जोपासतात. अशा छायाचित्रण दिनानिमित्त प्रस्तुत लेखातून छायाचित्राचे महत्त्व सांगणारा लेख दै ‘साईमत’च्या वाचकांसाठी देत आहोत…
फोटो काढायला कुणाला आवडत नाही…? आपण जगलेले अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात ‘कैद’ करत असतो. पुढील काळात हेच फोटो आठवणींच्या स्वरूपात आपले कायमचे सोबती बनतात. असे फोटो पाहतांना जुने दिवस पुन्हा जगण्याची एक वेगळीच भावना आपल्या मनात निर्माण होते. आजकाल बहुतांश लोकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करायला आवडते. अनेकांना प्रवास करतांना वेगवेगळ्या ठिकाणांची सुंदर छायाचित्रे अर्थात फोटो ‘क्लिक’ करायला आवडते. प्रत्येकाच्या जीवनात फोटो खूप महत्त्वाचे असतात. लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत. त्यामुळेच फोटो प्रत्येकासाठी खास असतात. दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी ‘छायाचित्र’ दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येकासाठीच महत्त्वाचा आहे. जे शब्दात लिहिता येत नाही तसेच जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते एका छायाचित्रामुळे स्पष्ट होते.
भारतात सर्वप्रथम १९ ऑगस्ट १९९१ मध्ये “जागतिक छायाचित्रण दिन” साजरा करण्यात आला. त्यानंतर, दरवर्षी १९ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. पूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा-वीस दिवसांची वाट पहावी लागत होती. आता मात्र, काळ बदलला आहे. तसेच छायाचित्रणाची माध्यमेही बदलली आहे. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईलने टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत आपल्याला पाहता येते. त्यामध्ये, नवनवीन अविष्कार येत गेले. त्यामुळे छायाचित्रणाचे क्षेत्र समृद्ध होत गेले. प्रकृतीने प्रत्येक माणसाला आपल्या डोळ्यांच्या रुपात जन्मताच एक कॅमेरा दिला आहे. ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या ‘छबीला’ आपल्या डोक्यात अंकित करू शकतो. तसे पाहिले गेल्यास तर प्रत्येक माणूस एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरवात केली. अनेक अविष्कारासोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळेसोबत समोर चालतांना लेन्सच्या छायाचित्रांना स्थायी रुपात समोर आणले. त्याच प्रवासाच्या यशाला आपण एक प्रकारे छायाचित्र दिनाच्या रुपात साजरे करतो.
छायाचित्र दिनाच्या रुपात १९ ऑगस्ट हा दिवस “जागतिक छायाचित्रण दिन” साजरा केला जातो. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात. ज्यांनी आपले अनमोल योगदान छायाचित्रणासाठी दिले आहे. आजच्या युगात फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी एकापेक्षा एक अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. याशिवाय फोटो काढण्यासाठी आता प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे आज फोटो काढणे ही गोष्ट खूप सोपी आणि सोयीस्कर झाली. मात्र, पूर्वी फोटो काढणे खूप कठीण असे काम होते. छायाचित्राच्या क्षेत्रासाठी ज्यांनी योगदान दिले. त्यांच्या आठवणी अजुनही ताज्या होतात. त्यातून नवीन छायाचित्रकारांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळते. हा दिवस फोटोग्राफीच्या कलेचा उत्सव आहे आणि या दिवसाचा उद्देश छायाचित्रकारांना (फोटोग्राफर्स) एकत्र आणून त्यांचे कार्य दर्शवणे आणि फोटोग्राफीच्या महत्वावर जोर देणे आहे. फोटोग्राफी आपल्याला जगायला आणि नवीन दृष्टीने पाहण्यास मदत करते. फोटोग्राफी आपल्याला क्षण कायम ठेवण्यास आणि आपल्या आठवणींना जागविण्यास मदत करते. ‘फोटोग्राफी’ ही एक संवाद साधण्याचे माध्यम आहे, जी आपल्याला आपल्या भावना आणि विचारांशी इतरांना जोडण्यास मदत करते. ‘जागतिक छायाचित्र दिन’ हा दिवस छायाचित्रकला आणि फोटोग्राफरांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. यादिवशी अनेक फोटोग्राफर त्यांच्या कामाचे प्रदर्शन आयोजित करतात. फोटोग्राफीच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करतात.
जुन्या आठवणी कॅमेरात होतात ‘कॅमेराबध्द’
छायाचित्रण ही एक कला आहे, ज्यात छायाचित्रांद्वारे सर्व परिस्थिती काहीही न बोलता सांगितली जाते. फोटोग्राफीला मोठा इतिहास आहे. पूर्वी एक फोटो काढण्यासाठी लोकांना दूर जावे लागायचे. पण बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहिती, कला आणि दळवळणाच्या क्षेत्रात बदल घडून आला आहे. आता सध्या सगळ्यांकडे स्मार्ट फोन, कॅमेरा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कोणीही कधीही हव्या तशा आठवणी कॅमेरात ‘कॅमेराबध्द’ करू शकतात. फोटो आणि फोटोग्राफी कलेचे महत्त्व लक्षात घेऊन छायाचित्र दिन साजरा केला जातो. ऐतिहासिक ठिकाणे, अपरिचित माणसे, निसर्ग, समाजाची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भावना आणि नातेसंबंध हे सर्व छायाचित्रांचे विषय म्हणून महत्त्वाचे आहेतच, पण मग त्या प्रत्येक विषयाची छायाचित्रे, उत्तम फोटो डॉक्युमेंट्स अर्थात छायाचित्र दस्तावेज मानली जातात का…? जी छायाचित्रे आपल्याला आपल्या जगाबद्दल काहीतरी महत्त्वाचे सांगतात आणि त्याचबरोबर जगाबद्दल आपल्याला एका नवीन पद्धतीने विचार करायला भाग पडतात, ती छायाचित्रे उत्तम छायाचित्र दस्तावेज मानली जातात.
छायाचित्रांसाठी ‘वृत्तपत्र’ एक प्रभावी माध्यम
अशातच आजुबाजुच्या दैनंदिन घडामोडी कळण्यासाठी ‘वृत्तपत्र’ हे एक प्रभावी बहुजन माध्यम आहे. ह्या क्षेत्रात छायाचित्राला खूप महत्त्व असते. त्यामुळे वृत्तपत्रात छायाचित्रांचा उपयोग केला जातो. भारतात वृत्तपत्र व्यवसायाचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु खास वृत्तपत्रीय छायाचित्रणाच्या शिक्षणाची सोय कोठेच आढळत नाही. काही मोठ्या वृत्तपत्रात खास छायाचित्रकारांची नेमणूक केलेली असली तरी मुख्यत्वे हौशी उमेदवारही वर्तमानपत्रास छायाचित्रे पुरवित असतात. त्यामुळे मानवी जीवनासह वृत्तपत्र क्षेत्रात ‘छायाचित्राचे’ महत्त्व आजही तेवढेच ‘अबाधित’ आहे, हेही तेवढेच खरे…!
छायाचित्रासाठी छायाचित्रकारांची अहोरात्र होते धडपड
‘छायाचित्रण हे भावना, स्पर्श आणि प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. ज्या वेळेस तुम्ही फोटोत एखादा प्रसंग टिपता त्यावेळेस तो कायमचा बंदिस्त केला जातो. कालांतराने तुम्ही सर्व काही विसरलात तरी (छायाचित्रांद्वारे) छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात राहतात’, अशा अहोरात्र छायाचित्र टिपण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व छायाचित्रकार बांधवांना छायाचित्र दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…!
– शरद भालेराव
उपसंपादक, दै.साईमत,
जळगाव.
मो.क्र.८८३०४१७७३६