Harijan Girls’ Hostel ‘Gopika’ Group : युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालयाच्या ‘गोपिका’ पथकाला

0
17

सागर पार्कवर चित्तथरारक कसरतींसह शौर्यवीर, वज्रनाथ, पेशवा ढोलपथकातील ४१५ वादकांवर युवतींचा जल्लोष

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जळगावच्या गोपिकांनी रोप मल्लखांब… चित्तथरारक कसरती… सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांमधून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगणित केला. सोबतीला शौर्यवीर, पेशवा, वज्रनाथ ढोलपथकातील ४१५ वादकांनी परिसर दणाणून सोडला. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालय ‘गोपिकांच्या’ पथकाने चौथ्या थरावर जाऊन फोडून मिळविला.‌ त्यांना विशेष पारितोषिकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनतर्फे कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान (सागर पार्क) वर २० फुट उंचीवर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन केले होते.

यावेळी खा.स्मिता वाघ, आ.सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ऐश्वर्या रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जेडीसीसी बँकचे संचालक अरविंद देशमुख, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, युवतींच्या दहीहंडी समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी नागूलकर, प्रा.शमा सराफ, निलम जोशी, अनिता पाटील, यामिनी कुळकर्णी, सोनाली महाजन, चेतना नन्नवरे, लिना पवार, डॉ. हेमांक्षी वानखेडे, श्रीया कोकटा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दहीहंडी फोडणाऱ्या गोपिकांच्या पथकाला चषकाने सन्मानित करण्यात आले. यासोबतच इतर सहभागी झालेल्या संघानाही गौरविण्यात आले. यावेळी छाया बोरसे, मंजुषा भिडे, कामिनी धांडे, छाया चिरमाडे या परीक्षकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघातील सुमारे ५०० गोपिकांनी सहभाग घेतला. गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

दहीहंडी पथकात ११ युवती पथकांचा सहभाग

११ युवतींच्या पथकात किडस् गुरूकुल शाळा, नूतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टिट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा, एन.सी.सी. आदी पथकांचा समावेश होता.
यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया यांच्यासह पदाधिकारी, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.

पुढील वर्षापासून विजेत्या संघाना रोख पारितोषिके देण्याची घोषणा

अहिल्यादेवी होळकर यांच्या जनशताब्दीनिमित्त कर्तृत्वान महिलांच्या सन्मानार्थ राजेश नाईक यांच्या संकल्पेतून विशेष सजावट केली होती. सोफिया कुरेशी, व्योमा सिंग, प्रेरणा देवस्थळी, दिव्या देशमुख, दीपा मलिक, राही पाखले, टेसी थामस, वंतिका अग्रवाल, गीता गोपीनाथ यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी दहीहंडीत विशेष स्थान देण्यात आले. पुढील वर्षापासून विजेत्या संघाना रोख पारितोषिके देण्याची घोषणा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here