साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या सहकार्याने शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत होमिओपॅथीक शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या पुढाकाराने आरोग्य केंद्राच्यावतीने विविध सुविधा विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी होमिओपॅथीक औषधोपचार शिबिर घेतले जाणार आहेत. जळगावच्या शासकीय होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या सहकार्याने मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. शिबिराचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या उपस्थितीत झाले. दुपारपर्यंत शिबिराचा ५५ रूग्णांनी लाभ घेतला. शिबिराला शासकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सरताळे, डॉ. मनोज विसपुते, डॉ. अजित विसपुते, डॉ. निलेश पाटील, डॉ. प्रताप वळसे यांच्यासह विद्यापीठाचे आरोग्य अधिकारी डॉ. सांरग खाचणे, डॉ. साजिया शेख यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.