साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
निखील राजपूत याच्या खुनानंतर काही दिवसांचा अवधी उलटत नाही तोच भुसावळात पुन्हा खून झाल्याने परिसर हादरला आहे. रविवारी सकाळी खडका रोड परिसरातील मणियार हॉलजवळ जिम ट्रेनर नाजीर शेख नशीर (वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हा तरुण मृत झाला. भरदिवसा झालेल्या घटनेने शहरातील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोच रविवारी सकाळी पुन्हा एकदा शहरात खून झाल्याने खुनाची मालिका सुरूच आहे.
यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील मणियार हॉल जवळ माहीर फिटनेस क्लबजवळ जिम ट्रेनर नाजीर शेख नशीर हा रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आपले फिटनेस क्लब उघडात असतांना पूर्व वैमनस्यातून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार करण्यात आले होते. हल्ल्याकरून हल्लेखोर तेथून पळून गेले. जखमी नाजीर शेख नशीर यास परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात काळीज पिळवटून काढणारा आक्रोश केला.
दरम्यान, मृत नाजीर शेख नशीर याच्या कुटुंबीयांनी सुमारे सात संशयितांची नाव्ो पोलिसात दिली असल्याचे समजते तर तिघांना पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसर हादरला असून तरूणाच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत नाजीर शेख नशीरचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.