साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरात क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहोचला असून जळगाव क्रिकेट लीग-२०२६ (JCL T-20) च्या निमित्ताने क्रीडाप्रेमींना रोमांचक क्रिकेटचा अनुभव मिळणार आहे. दि. १८ ते २६ एप्रिलदरम्यान मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस या भव्य क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार रंगणार असून, शनिवारी भव्य उद्घाटन सोहळ्याने या लीगची अधिकृत सुरुवात होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विविध मतदारसंघांचे आमदार तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी हा एक मोठा क्रीडा उत्सव ठरणार आहे.
या स्पर्धेत सहा संघ, सहा प्रशिक्षक आणि एकूण १०८ खेळाडू मैदानात उतरून आपले कौशल्य दाखवणार आहेत. जळगाव कोगटा किंग, जामनेर सातपुडा हिरोज, पाचोरा एसकेटी योद्धाज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, रावेर रॉयल्स आणि अमळनेर सुहांस जायंट्स या सहा संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघ इतर संघांविरुद्ध पाच सामने खेळणार असून त्यानंतर क्वालिफायर, एलिमिनेटर आणि ग्रँड फायनलच्या माध्यमातून विजेता निश्चित होईल.
स्पर्धेचे आयोजन आयपीएलच्या धर्तीवर करण्यात आले असून, एकूण १९ सामने खेळवले जाणार आहेत. चौकार-षटकारांचा वर्षाव, भेदक गोलंदाजी, अचूक क्षेत्ररक्षण आणि रोमांचक क्षणांचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, जैन ड्रीम स्पेसेस मैदानाला आधुनिक स्टेडियमसारखा लूक देण्यात आला असून LED स्क्रीन, आकर्षक गॅलरी आणि दर्जेदार प्रकाशयोजना यामुळे दिवस-रात्र सामने पाहणे प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सामना १८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता जामनेर सातपुडा हिरोज आणि पाचोरा एसकेटी योद्धाज यांच्यात होणार आहे. तर सायंकाळी चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स आणि जळगाव कोगटा किंग यांच्यात रोमांचक सामना रंगणार आहे. पुढील दिवसांमध्ये दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन सत्रांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.
ही संपूर्ण स्पर्धा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि अलरीक इलेक्ट्रिकल्सच्या सहप्रायोजकत्वाखाली आयोजित करण्यात आली आहे. गुणलेखन आणि स्कोअरिंगची जबाबदारी अनुभवी तज्ज्ञांकडे सोपवण्यात आली आहे.
जैन ड्रीम स्पेसेस मैदान पूर्णपणे सज्ज झाले असून, क्रिकेटच्या या महासंग्रामासाठी जळगावकरांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चौकार-षटकारांच्या गजरात आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात ही लीग जळगावच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिणार आहे.
