साईमत / जळगाव
राज्य सरकारने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांच्या बचत गटांना केंद्रस्थानी ठेवून कृषी क्षेत्रात नवी योजना सुरू करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या दुसऱ्या टप्प्यात गावपातळीवर कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार आहे. पात्र महिला बचत गटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, हे अनुदान कमाल २४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे.
ग्रामीण भागात शेतीसाठी मजुरांची कमतरता भासत असल्याने यांत्रिकीकरणाची गरज वाढत आहे. मात्र, लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी यंत्रे खरेदी करणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन अवजार बँकेच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या बँकांमधून पेरणी, लावणी, कापणी यांसारख्या शेतीच्या महत्त्वाच्या टप्प्यांसाठी आवश्यक यंत्रे उपलब्ध करून दिली जातील. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाईन हार्वेस्टर, फवारणी पंप यांसारख्या आधुनिक साधनांचा समावेश असेल. स्थानिक पीक पद्धतीनुसार यंत्रांची निवड करण्याची मुभाही गटांना देण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला बचत गटांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना बँक खात्याची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
