‘बहिणाईंचे भावविश्व’ कार्यक्रमाप्रसंगी कवी किरण डोंगरदिवे यांनी व्यक्त केली अपेक्षा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शंभर वर्षांपूर्वी साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी जो विचार समाजापुढे ठेवला, त्यातून आजची पिढी घडत आहे. अध्यात्मासह विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्यास शिकविते. ह्या शिकवणीवर साहित्य क्षेत्रातील नामांकित ज्ञानपीठ, साहित्य अकादमीसह अन्य पुरस्कार त्यांच्या ओव्यांपुढे मागे पडून जातात. कारण मराठीतील प्रत्येक साहित्यिक, विद्यार्थी, अभ्यासक हे बहिणाबाईंच्या कविता वाचल्याशिवाय राहत नाही, हाच खऱ्या अर्थाने त्यांचा ‘लोक पुरस्कार’ होय. आगामी पाच वर्षानंतर बहिणाबाई चौधरींची १५० व्या जयंतीनिमित्त शासनाने बहिणाबाईंची गाणी आणि संतवाणीसाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले पाहिजे, अशी अपेक्षा बुलढाणाचे कवी किरण डोंगरदिवे यांनी व्यक्त केली. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्यावतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात ‘बहिणाईंचे भावविश्व’ कार्यक्रमादरम्यान प्रतिमा पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी कवयित्री रेणुका पुरोहित (पुणे), बहिणाबाईंच्या पणत सून पद्माबाई चौधरी, स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कांचन खडके आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ज. सू. खडके विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या विद्यार्थ्यामधील जयश्री मिस्त्री यांनी ‘अरे संसार संसार’ रचनेने झाली.
प्रास्ताविकात विजय जैन यांनी संवेदनशीलतेतून श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी हा ट्रस्ट उभा केल्याचे सांगितले. भारती कुलकर्णी यांनीही परिसरात राहत असतानाच्या आठवणी सांगत बहिणाबाईंच्या ओवी सादर केल्या. यावेळी रेणुका पुरोहित यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाप्रसंगी रामपेठ चौधरी वाड्यातील भानुदास नांदेडकर, वैशाली चौधरी, कविता चौधरी, शोभा चौधरी, निलमा चौधरी, दीपाली चौधरी, किर्ती चौधरी, सुनंदा चौधरी, शितल चौधरी, कोकिळा चौधरी, श्रृती चौधरी यांच्यासह चौधरी वाड्यातील नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी देवेंद्र पाटील, जितेंद्र झंवर, प्रदीप पाटील, दिनेश थोरवे, राजेंद्र माळी, समाधान महाजन, शरद धनगर यांनी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय ज्ञानेश्वर शेंडे तर सूत्रसंचालन किशोर कुलकर्णी यांनी केले.